Trump and Putin meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भेटीची ही तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे. त्यांनी आधी सांगितले होते की, बैठक आधी होऊ शकली असती, परंतु "सुरक्षा व्यवस्थेमुळे" तारीख पुढे ढकलण्यात आली.

ट्रम्प यांचे अधिकृत विधान

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले, 'अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून, मी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पुढील शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) अलास्का या महान राज्यात भेटू. अधिक माहिती लवकरच दिली जाईल. या विषयावर लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!'

अमेरिका-रशिया शिखर परिषद चार वर्षांनी 

2021 नंतरची ही पहिलीच अमेरिका-रशिया शिखर परिषद असेल. शेवटचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुतिन यांची जिनेव्हा येथे भेट घेतली होती. युक्रेन युद्ध संपवण्याच्या ट्रम्पच्या प्रयत्नांमध्ये ही बैठक महत्त्वाची ठरू शकते, जरी मॉस्को आणि कीव्हच्या शांततेच्या परिस्थितीत अजूनही मोठा फरक आहे. दोन्ही देशांमधील चर्चा यापूर्वी अनेक पातळ्यांवर अयशस्वी झाल्या आहेत.

ट्रम्प यांनी शांतता कराराचे दिले संकेत 

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रस्तावित शांतता कराराचे संकेत दिलेत. त्यांनी सांगितले की, त्यात 'प्रदेशांची अदलाबदली' होऊ शकते, परंतु त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही. ट्रम्प म्हणाले, 'आम्ही काही प्रदेश परत मिळवण्याचा आणि काही अदलाबदली करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते गुंतागुंतीचे आहे. पण आम्हाला काहीतरी परत मिळेल, आम्ही काहीतरी अदलाबदली करू आणि ते दोघांच्याही हिताचे असेल.'

रशियाची संभाव्य ऑफर

क्रेमलिनच्या जवळच्या लोकांसह काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रशिया ज्या चार प्रदेशांवर दावा करतो, ते बाहेरील प्रदेश सोडण्याची ऑफर देऊ शकतो. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की ही मोठी शांतता करार करण्याची शेवटची संधी आहे का?, तेव्हा ट्रम्प म्हणाले, "मला 'शेवटची संधी' हा शब्द आवडत नाही." ते पुढे म्हणाले, "जेव्हा बंदुका गोळीबार सुरू करतात तेव्हा त्यांना थांबवणे खूप कठीण असते."

अलिकडेच, पुतिन यांच्या भूमिकेवर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी इशारा दिला होता की जर रशियाने युद्ध संपवण्यास सहमती दर्शवली नाही तर ते रशिया आणि त्याची निर्यात खरेदी करणाऱ्या देशांवर नवीन निर्बंध आणि शुल्क लादतील. काल (शुक्रवारी) संध्याकाळपर्यंत हे निर्बंध लागू केले जातील की नाही हे स्पष्ट नव्हते.