Plane Catches Fire: धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमानाला भीषण आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. आग लागलेल्या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर जवळपास 100 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. चीनच्या चोनकिंग विमानतळावर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पीपल्स डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील सर्व 113 प्रवासी आणि 9 क्रू कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेती काही प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धावपट्टीवर असलेल्या विमानाला आग लागली असल्याचे दिसत आहे. तर, अग्निशमन यंत्रणेकडून विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही व्हिडीओत दिसून आले. आग लागलेल्या विमानातून धुराचे लोळ उठतानाही दिसत आहेत.
तिबेट एअरलाइन्सने याबाबत निवेदन जारी करत घटनेची माहिती दिली आहे. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे एअरलाइन्सने सांगितले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, मार्च महिन्यातही चीनमध्ये मोठा विमान अपघात झाला होता. कुनमिंगहून गुआंगझोऊ येथे जात असलेल्या चायना ईस्टर्न विमान हे मार्च महिन्यात अपघातग्रस्त झाले होते. डोंगराळ असलेल्या या भागात 29 हजार फूट उंचीवर असताना विमानाला आग लागली होती. यामध्ये 132 प्रवासी होते. हा अपघात चीनमधील मागील 30 वर्षातील सर्वात मोठा अपघात होता. अपघाताचे ठोस कारण समोर आले नव्हते. या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहितीचे विश्लेषण केले जात आहे.