WHO, Omicron, Covid-19 Next Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची (Omicron Cases)  संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाचे  2.1 कोटी रुग्ण आढळल्याचे गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) सांगितले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची तिसरी लाट (Covid Third Wave) किती तीव्र आहे, याचा अंदाज लागू शकतो. जगभरातील संशोधकांच्या मते, ओमायक्रॉन हा कोरोनाचा अखेरचा व्हेरियंट नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांच्या मते, 'कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट लवकरच येऊ शकतो, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरु शकतो. '


जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) सोशल मीडियावरील एका चर्चेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना केरखोव्ह यांनी इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे होत आहे. आधी आलेल्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंट तितका धोकादायक नाही. पण पुढील काही दिवसांत ओमायक्रॉनपेक्षाही जास्त शक्तीशाली व्हेरियंट येण्याची शक्यता आहे.  


डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या की,  नवीन येणारा व्हेरियंट कशापद्धतीने प्रभाव टाकेल हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. नवीन येणारा व्हेरियंट अधिक धोकादायक असेल का? मृताची संख्या वाढेल का? की ओमायक्रॉनपेक्षा कमी धोकादायक असेल? यासारखे प्रश्न जगाला सतावत आहेत. पण लोकांनी हे लक्षात ठेवावं की जसा वेळ जाईल तसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमकुवत होणार नाही. लोकांनी भ्रमात राहू नये. पुढील व्हेरियंट कमी धोकादायक असेल याची कोणतीही हमी नाही.  






कोरोना काळात नियमांचं पालन करावे लागेल. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरावा लागेल. त्याशिवाय लसीकरणही करावे लागेल. पुढील येणारा व्हेरियंट लसीलाही चकवा देऊ शकतो अन् ओमायक्रॉनपेक्षा जास्त वेगाने संसर्ग होऊ शकतो, असे  डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.