तुर्कीतील इस्तंबूल विमानतळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व का?
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 02:35 AM (IST)
इस्तंबुल : तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत. इस्तंबूलचा अतातुर्क विमानतळ लंडनच्या हिथ्रो आणि पॅरिसच्या चार्ल्स द गॉल विमानतळांनतर युरोपातला तिसरा सर्वात व्यस्त विमानतळ आहे. इस्तंबूल शहराचा काही भाग आशिया खंडात तर काही युरोप खंडात आहे. रशियासोबत तुर्कस्तानच्या वादामुळे रशियन पर्यटकांची संख्या रोडावल्यावरही गेल्यावर्षी सहा कोटींहून अधिक प्रवाशांनी अतातुर्क विमानतळावरुन ये-जा केली. तुर्कस्तान हा खरंतर शांत आणि सुरक्षित देश मानला जायचा, पण गेल्या काही महिन्यांपासून अंकारा आणि इस्तंबूल या तुर्कस्तानातील दोन मोठ्या शहरांत वारंवार दहशतवादी हल्ले झाले आहेत.