बँकॉक : राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी थायलंडचे राजे माहा वजीरालॉन्गकॉर्न यांनी सगळ्यांना धक्का देत आपल्या सुरक्षा पथकाच्या कमांडरसोबत लग्न केलं आणि त्यांना राणी सुथिदा अशी उपाधीही दिली. काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे.

66 वर्षीय राजे वजीरालॉन्गकॉर्न यांचं हे चौथं लग्न आहे. राजा वजीरालॉन्गकॉर्न यांना तीन राण्यांपासून पाच मुलं आणि दोन मुली आहेत. रॉयल गॅझेटमधून त्यांच्या शाही लग्नाची घोषणा झाली. बुधवारी झालेल्या या शाही लग्नाच्या विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आल्या.

वजीरालॉन्गकॉर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील राजा भूमिबोल अडुलयादेज यांचं 13 ऑक्टोबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्येच देशाच्या संसदेने मांडलेला राजा बनण्याचा प्रस्ताव माहा वाजीरालॉन्गकॉर्न यांनी स्वीकारला. त्यामुळे आता वजीरालॉन्गकॉर्न कायदेशीररित्या सिंहासनावर विराजमान होतील. त्याचे वडील 70 वर्ष सिंहासनाधीश होते.

याच आठवड्यात बौद्ध आणि ब्राह्मण विधीनुसार त्यांच्या राज्याभिषेक होणार आहे. यादरम्यान एक भव्य मिरवणूकही निघणार आहे.

44 वर्षीय सुथिदा यांचं पूर्ण नाव सुथिदा तिदजई असून त्या थाय एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडंट होत्या. 2014 मध्ये वजीरालॉन्गकॉर्न यांनी सुथिदा यांना आपल्या बॉडीगार्ड पथकाचं डेप्युटी कमांडर बनवलं होतं. यानंतर डिसेंबर 2016 मध्ये सुथिदा यांना पूर्ण सेनापती बनवण्यात आलं आणि 2017 मध्ये थानपयिंगही बनवलं, जे एक शाही पद असून त्याचा अर्थ लेडी असा आहे.

खरंतर राणी सुथिदा अनेक वर्षांपासून राजासोबत पाहायला मिळत होत्या. पण त्याच्या नात्याबाबत अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नव्हतं.