Thailand News : थायलंड देशानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. थायलंमध्ये आता गांजाची शेती करणं शक्य होणार आहे. गांजाची शेती, त्याची विक्री आणि वापर करण्याला परवानगी दिली आहे. असा निर्णय घेणारा थायलंड आशियातील पहिला देश ठरला आहे. जानेवारी 2022 पासून यावर वाटाघाटी सुरु होत्या. अखेर तेथील  सरकारनं गांजाची शेती करायला ग्रीन सिग्नल दिला आहे. सरकारने बंदी घातलेल्या ड्रग्जच्या यादीतून गांजा काढून टाकला आहे. गांजाची शेती करायला परवानगी दिली असली तरी स्मोकिंग करण्यावर अजूनही बंधन आहे. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे.
 
दरम्यान, थायलंडचे आरोग्य मंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी याबाबच्या वृत्ता पुष्टी दिली आहे. चार्नविराकुल म्हणाले की, कायदेशीर गांजाच्या उत्पादनामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. जे देश पर्यनावर अवलंबून आहेत, त्यांना कोरोना काळात मोटा फटका बसला आहे. थायलंड हा देखील पर्यटनावर अवलंबून असलेले देश आहे. थायलंडला कोरोना संकटाचा मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत थायलंड सरकार त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विविध योजनांवर काम करत आहे. गांजाबाबतचा सरकारचा हा निर्णयही त्यातलाच एक भाग  असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साथीच्या रोगापूर्वी, थायलंडच्या जीडीपी आणि रोजगारामध्ये पर्यटनाचा वाटा 20 टक्के होता.


नवीन कायद्यानं पूर्णपणे मोकळीक दिली आहे का? 


आता थाईलंडचे लोक त्यांच्या घरात गांजाचे रोप देखील वाढवू शकतात. परंतू ते फक्त आणि फक्त वैद्यकीय हेतूसाठी वापरले जाऊ शकते. आणखी एक गोष्ट. आपण सार्वजनिक ठिकाणी गांजा, धूम्रपान करु शकत नाही. तुम्ही असे काही करताना आढळल्यास तुम्हाला 60 हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.


थायलंड हा दक्षिण-पूर्व आशियातील एक महत्वाचा देश आहे. जिथे अमली पदार्थांबाबत अतिशय कडक कायदे आहेत. या देशात अंमली पदार्थांचे सेवन आणि वापर केल्यास शिक्षा आहे. हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल, पण आता येथे गांजाच्या लागवडीला मान्यता मिळाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.