पॅरिस :  फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाला. राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीत एक ट्रक घुसला. यात तब्बल 77 जणांना चिरडून मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी आहेत.

 

 

फ्रान्समध्ये 14 जुलै हा बॅस्टिल डे म्हणजेच राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समुद्रकिनाऱ्यावर फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. त्याचवेळी हा ट्रक घुसला.

 

 

अपघात नाही हल्ला

सुरुवातीला हा अपघात असल्याचं म्हटलं जात होतं. पण अपघात नसून हा हल्ला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. चालकाने गर्दीमध्ये ट्रक घुसवल्यानंतर गोळीबारही केला. यानंतर सगळीकडे मृतदेहांचे खच पडले होते.

 

 

ट्रक चालकाला कंठस्नान
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रक चालकाला तात्काळ गोळ्या घालून ठार केलं. ट्रकचालक अरेबिक भाषेतून बोलत होता, असं काही स्थानिकांनी सांगितलं. सध्या कोणालाही ओलिस ठेवलेलं नाही. शिवाय दहशतवादीविरोधी पथक या प्रकरणाचा तसाप करत आहे.

 

 

ISIS जबाबदारी स्वीकारली
फ्रेन्च मीडियानुसार, कुख्यात अतिरेकी संघटना आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हल्ल्यातील आणखी एका संशयिताने पळ काढल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

ट्रकमध्ये ओळखपत्र सापडलं
ट्रकमध्ये फ्रेन्च-ट्युनिशियाचे ओळखपत्र सापडले आहे. राष्ट्रपती ओलांद यांनी दहशतवादी हल्ल्याचा इन्कार केलेला नाही. यासोबतच देशात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकासह बहुतांश देशांनी या हल्ल्याचा विरोध करत, तपासात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

 

भारतीय नागरिक सुरक्षित
पॅरिसमधील भारताचे राजदूत नागरिकांच्या संपर्कात असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर +33-1-40507070 जारी केला आहे.