काबुल : अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. देशातील दुसरं मोठं आणि महत्वाचं शहर असलेल्या कंदहारवर आता तालिबान्यांनी कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. तालिबानी दहशतवादी आता ज्या वेगाने एक-एक प्रदेशावर कब्जा मिळवत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी आता राजधानी 'काबुल दूर नही' अशी काहीशी परिस्थिती आहे. 


तालिबान्यांनी कंदहारवर कब्जा मिळवल्यानंतर आता ते काबुलकडे कूच करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तालिबान्यांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करु नये असंही सांगितलं आहे. 


 






अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत असलेली चिंता आता खरी होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून त्यांनी मोठ्या भूभागावर वर्चस्व मिळवल्याचं स्पष्ट झालंय.


अफगाणिस्तानमधीला या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कतारची राजधानी दोहा या ठिकाणी बैठकीचे सत्र सुरु आहे. यामध्ये चीन, अमेरिका, पाकिस्तान, रशिया या देशांचा समावेश असून त्यामध्ये भारतालाही उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. 


भारतीयांनो परत या, केंद्र सरकारचा सल्ला
अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती. त्यामुळे या आधीच भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे. त्यानंतर भारताने कंदहार नंतर मजार-ए-शरीफमधील आपले वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने आपले मुत्सद्दी, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.


अफगाणिस्तानच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार पाहता अनेक प्रांत आणि शहरांमध्ये व्यावसायिक उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. देशातील व्यावसायिक विमान उड्डान बंद होण्याआधी भारतात निघून या असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना त्यांच्या भारतीय कर्मचाऱ्यांना हवाई सेवा बंद करण्यापूर्वी अफगाणिस्तानमधील प्रकल्प स्थळांमधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. 


महत्वाच्या बातम्या :