नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनच्या मुलाला मनी लाँड्रिंग प्रकरणी एनआयएने अटक केली आहे. शकील अहमद असे सलाऊद्दीनच्या मुलाचे नाव असून, तो पेशाने टेक्निशियन आहे. श्रीनगरमधून शकीलवर अटकेची कारवाई करण्यात आली.

एनआयएच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये शकील अहमद याला श्रीनगरच्या रामबाग परिसरातून अटक केली.

गेल्याच वर्षी एनआयएने सय्यद सलाऊद्दीनच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच सय्यद शाहीद यालाही मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. शाहीदविरोधात एनआयएने चार्जशीटही दाखल केली आहे. शाहीद श्रीनगरच्या कृषी विभागात काम करत होता.

सय्यद सलाऊद्दीन कोण आहे?

सलाऊद्दीन हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. सलाऊद्दीन वारंवार भारताविरोधी वक्तव्य करत असतो. जम्मू-काश्मीरसह भारतातील अनेक ठिकाणी त्याने हल्लेही केले आहेत. एप्रिल 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारीही सय्यद सलाऊद्दीनच्या हिजबुल मुजाहिद्दीनने घेतली होती. या हल्ल्यात 17 लोक जखमी झाले होते.