न्यूयॉर्क: अमेरिकेच्या अणवस्त्र प्रकल्पावरती चीनचा एका स्पाय बलून दिसल्याची माहिती समोर येत आहे. या बलूनच्या माध्यमातून अमेरिकेतील संवेदनशील अण्वस्त्रांच्या साईट्सवर चीन नजर ठेवत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. तर हे स्पाय बलून नसून मेटेरोलॉजिकल सॅटेलाईट असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. अमेरिकेच्या अवकाशात दिसणाऱ्या या बलूनमुळे अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढल्याचं दिसून येतंय.


अमेरिकेच्या अवकाशात असलेल्या या स्पाय बलूनचा मागोवा घेतला जात असल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली आहे. हा स्पाय बलून अमेरिकेच्या वायव्य भागात उडताना दिसला आहे. याच भागात अमेरिकेचे  संवेदनशील एअरबेस आणि सामरिक क्षेपणास्त्रं आहेत. 


एएफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पेंटागॉन अमेरिकेवर उडणाऱ्या एका चिनी गुप्तचर फुग्याचा मागोवा घेत आहे, जे अत्यंत संवेदनशील अण्वस्त्रांच्या साईट्सवर लक्ष ठेवत आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍यानं सांगितलं की, लष्करी अधिकार्‍यांनी हा स्पाय बलून फोडण्याचा विचार केला होता, पण त्यामुळे जमिनीवरील अनेक लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.


 




संवेदनशील ठिकाणांवर पाळत


चीनी स्पाय बलूनच्या माध्यमातून संवेदनशील एअरबेस आणि सामरिक क्षेपणास्त्रं असलेल्या ठिकाणांवर पाळत ठेवली जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. इतरही गुप्त माहिती मिळवण्याचा त्यामागे उद्देश असू शकतो. 


अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी हा बलून अमेरिकेच्या हवाई हद्दीत दाखल झाला होता. त्यानंतर अमेरिकन फायटर जेटनी त्या बलूनचं परीक्षण केलं. खाली असलेल्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन तो बलून फोडण्यात आला नाही. 


बलून चीनचा असल्याचं मान्य 


ही बलून आपला असल्याचं चीनने मान्य केलं आहे. पण याचा वापर प्रामुख्याने हवामान संशोधनासाठी केला जात होता असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. वेस्टर्लिजमुळे हे एअरशिप आपल्या नियोजित मार्गापासून खूप दूर गेल्याचं सांगत चीनने याबद्दल खेदही व्यक्त केला आहे.


अमेरिकेच्या आकाशात सापडलेल्या या चिनी बलूनमुळे अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांनी आपला बीजिंग दौरा अचानक रद्द केला आहे. त्यामुळे या दोन देशांदरम्यान असलेल्या तणावात आणखी वाढ झाली आहे.