नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये नोकरी गमावल्याने जवळपास 10 हजार भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन यासर्वांपर्यंत खाद्यपदार्थ पोहचवले आहेत. तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमधील 30 लाख भारतीय बांधवांना आपल्या देश बांधवांना मदतीचे आवाहनही केले आहे. भारतीय राष्ट्राच्या सामुहिक संकल्पाशिवाय काही मोठे नाही असे म्हटले आहे.

 

परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ''आम्ही रियाधमधील भारतीय दूतावासाला सौदी अरेबियामध्ये वसलेल्या भारतीयांना मोफत धान्य पुरवण्याच्या सुचना केल्या आहेत.'' त्यांनी सांगितले आहे की, ''सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये भारतीयांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.'' सुषमा स्वराज यांना सौदीमधील एका भारतीयाने ट्विट करून 800 भारतीय तीन दिवसांपासून उपाशी असल्याची माहिती देऊन हस्तक्षेपाची मागणी केली होती.

 

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालायने सांगितले की, ''सौदी अरेबियामध्ये जवळपास 10 हजारहुन अनेक भारतीयांन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या समस्येकडे लक्ष ठेवन असून, यावरील उपाय करण्याचे सर्वेतोपरी अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

 



 

सुषमा स्वराज म्हणाल्या की, ''सौदी अरेबियामध्ये नोकरी गमावलेला कोणताही भारतीय उपाशी बसणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते, मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.'' त्या म्हणाल्या की, ''सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये सर्वात जास्त भारतीयांना आपल्या नोकरी गमवाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कामाचा मोबदला न देताच, कारखाने बंद केले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया आणि कुवेतमधील भारतीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.''

 



 

त्या पुढे म्हणाल्या की, ''परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर या विषयावर सौदी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच जिथे भारतीय कामगार मदतीच्या प्रतिक्षेत आहेत, तिथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी यापूर्वीच जेद्दाजवळील हायवे कॅम्पकडे रवाना झाले आहेत.''

 

वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जेद्दामधील भारतीय समुदायाची भेट घेऊन 15,475 किलोग्रॅम धान्याचे वाटप केले आहे.