SpiceJet : कराचीमध्ये (Karachi) जवळपास 11 तास अडकून पडल्यानंतर, दिल्ली-दुबई स्पाईसजेटचे (SpiceJet) 138 प्रवासी (Passengers) अखेर युएईच्या (UAE) पर्यायी विमानात चढले आणि पुढच्या प्रवासाला रवाना झाले. प्रवाशांसाठी हे विमान मंगळवारी संध्याकाळी भारतातून कराचीमध्ये पाठवण्यात आलं होतं. स्पाइसजेटच्या बोईंग 737 MAX विमानात (SpiceJet's Boeing 737 MAX Aircraft) मंगळवारी सकाळी इंधन इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यानंतर कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Unscheduled Landing) करण्यात आलं होतं. विमानात बिघाड झाल्याचे संकेत मिळताच वैमानिकांनी इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.
विमान वाहतूक नियामक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, "वैमानिकांना इंधनाच्या प्रमाणात असामान्य घट झाल्याचं लक्षात आलं". यामुळे वैमानिकांनी कराचीमध्ये लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीवरून दुबईला जात होतं. पण अचानक डाव्या बाजूच्या टँकमधील इंधन कमी झाल्याचा अलार्म मिळाल्यानं या विमानाचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. या संबंधी कराची विमानतळाशी संपर्क केला आणि त्यानंतर हे लॅन्डिंग करण्यात आलं. नंतर निरीक्षण केल्यानंतर या टॅंकमध्ये कोणतेही लीक नसल्याचं स्पष्ट झालं. या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती DGCA ने दिली आहे.
एअरलाईन्सचं म्हणणं काय?
एअरलाइन्सच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "5 जुलै 2022 रोजी, स्पाइसजेट बी737 विमानाचं उड्डाण एसजी-11 (दिल्ली - दुबई) इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आलं. विमान कराचीत होतं. सुरक्षितपणे उतरले आणि प्रवासीही सुखरुप होते. विमानात कोणत्याही प्रकारची बिघाड झाल्याची कोणतीही पूर्व माहिती नव्हती. प्रवाशांना अल्पोपहारही देण्यात आला आहे."
स्पाइसजेटनं पर्यायी विमान पाठवलं
स्पाईसजेटनं प्रवाशांना दुबईला नेण्यासाठी मुंबईहून एसजी 9911 हे पर्यायी विमान पाठवलं, जे रात्री 9:20 च्या सुमारास रवाना झालं. "साहजिकच विमानाच्या लाईट इंडिकेटरमध्ये अडचण आली होती आणि ती लगेच दुरुस्त करता आली नाही. त्याला इंजिनीअर्सची मान्यता नव्हती, त्यामुळे मुंबईहून दुसरे विमान प्रवाशांसाठी रवाना करण्यात आलं.", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
मंगळवारी दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड
मंगळवारी स्पाईसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आधी कराचीत विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. त्यानंतर, गुजरातमधील कांडला येथून मुंबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाच्या बाजूच्या विंडशील्डमध्ये तडा गेल्यानं त्यांनी मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केलं. विमान कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
17 दिवसात तांत्रिक बिघाडाची सातवी घटना
स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची गेल्या 17 दिवसांतील ही किमान सातवी घटना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मंगळवारच्या दोन्ही घटना तसेच मागील पाच घटनांची चौकशी सुरु आहे.