'सिएटल टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दीप राय नामक शीख व्यक्ती शुक्रवारी वॉशिंग्टन राज्यातील केंट शहरातल्या आपल्या राहत्या घराबाहेर गाडी दुरुस्त करत होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या मते या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.
तर हल्ल्यात जखमी झालेल्या राय यांनी सांगितलं की, त्या व्यक्तीने 'माझ्या देशातून चालते व्हा', म्हणत गोळ्या झाडल्या. हल्लेखोर हा सहा फुट उंचीचा असून, कृष्णवर्णीय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्याने हल्ल्यावेळी आपल्या तोंडावर रुमाल बांधला असल्याची माहितीही त्यांनी सांगितलं.
या हल्ल्यासंदर्भात बोलताना, केंट पोलीस प्रमुख केन थॉमस यांनी आपण या घटनेकडे आपण गांभीर्याने पाहात असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, यासाठी एफबीआय आणि इतर संस्थांची मदत घेतली जात असल्याचीही माहिती दिली.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महिनाभरापूर्वी भारतीय वंशाचा इंजिनिअर श्रीनिवासन यांच्यावरही अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर कालच दक्षिण कॅरोलिनामध्ये हर्निश पटेल याचीही गोळ्या झाडून हत्या केल्याचं समोर आलं होतं.
तर दुसरीकडे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हर्निश पटेल यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच हर्निश पटेल यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
संबंधित बातम्या
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले...
‘माझ्या देशातून चालता हो,’ अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या