ऑस्टिन, टेक्सास : बिहारमधील नालंदातून अमेरिकेतील जोडप्याला दत्तक गेलेली चिमुरडी मृतावस्थेत आढळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांची शेरीन मॅथ्यूज दोन आठवड्यांपूर्वी घराबाहेरुन बेपत्ता झाली होती.


टेक्सासमधील रिचर्डसन सिटीतील घराबाहेरुन शेरीन 7 ऑक्टोबरला बेपत्ता झाली. दूध न प्यायल्यामुळे तिच्या दत्तक वडिलांना तिला शिक्षा म्हणून घराबाहेर उभं केलं होतं.

तिच्या घरापासून साधारण अर्धा मैल अंतरावर असलेल्या नाल्यात एका चिमुरडीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह शेरीनचाच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शेरीन कोण आहे?

टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने 23 जून 2016 रोजी बिहारमधील नालंदात असलेल्या एका अनाथाश्रमातून दीड ते दोन वर्षांची चिमुरडी दत्तक घेतली होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी तिला 'सरस्वती' असं संबोधलं जायचं. वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांनी तिचं नामकरण शेरीन असं केलं. या दाम्पत्याचं मूळ केरळमध्ये असल्याची माहिती आहे.

वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीसाठी भावंड हवं होतं. त्यामुळे त्यांनी सरस्वतीला दत्तक घेतलं. सरस्वतीच्या जन्मदात्या आई-वडिलांनी तिला गयामध्ये सोडलं होतं. त्यानंतर मदर तेरेसा अनंत सेवा संस्थानाकडून तिचा सांभाळ करण्यात आला.

शेरीन दूध पित नसल्यामुळे 37 वर्षीय वेस्लेने तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी तो बाहेर आला असता, ती कुठेच दिसली नाही. विशेष म्हणजे ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही.

राहत्या घराजवळ जंगली कुत्रे फिरकत असल्याची जाणीव असूनही पालकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार न नोंदवणं चिंताजनक असल्याचं कोर्टाने सांगितलं. वेस्लेला 7 ऑक्टोबरच्या रात्री रिचर्डसन पोलिसांनी अटक केली. लहान मुलाच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

अडीच लाख डॉलर्सचा बाँड दिल्यानंतर वेस्लेची सुटका करण्यात आली. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग डिव्हाईस घालण्याची सक्ती असून वेस्लेचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.

शेरीन बेपत्ता असताना, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करुन चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेतील भारतीय दूतावास यात लक्ष घालून असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.