टोकियो : मस्तीखोर मुलाला शिक्षा म्हणून जपानमध्ये पालकांनी जंगलात सोडून पळ काढल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जंगली अस्वलांचा वावर असलेल्या या जंगलात 7 वर्षांच्या चिमुरड्याचा शोध घेताना आता मात्र सर्वांच्या नाकी नऊ आले आहेत.


 
जपानमधील एक जोडपं आपल्या मुलगा आणि मुलीसोबत हायकिंग शनिवारी करण्यासाठी होक्काईदो बेटावरील एका पार्कमध्ये गेलं होतं. या पार्कजवळील पर्वताळ भागात जंगली अस्वलांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. मात्र मुलगा यामातो गाड्या आणि लोकांना दगड मारत असल्यामुळे वैतागलेले पालक त्याला ओरडले.

 
पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली. सुमारे 500 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली.

 

काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली. आधी आपण भाज्या तोडत असताना मुलगा नजर चुकवून पळाल्याचं सांगणाऱ्या जोडप्याने नंतर मात्र कबुली दिली.

 

सध्या पोलिसांसह 180 जणांचं पथक, कुत्रे आणि घोड्यांसह मुलाचा शोध घेत आहेत. मात्र दोन दिवसांनंतरही त्याचा शोध घेण्यात यश आलेलं नाही.