रियाध : एकीकडे महिलांविषयी कठोर कायदे असताना सौदी अरेबियाने रोबोंच्या बाबतीत आगळावेगळा निर्णय घेतला आहे. सोफिया या रोबोला सौदीमध्ये नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे. रोबोला सिटीझनशीप देणारा सौदी हा जगातला एकमेव देश ठरला आहे.

अमेरिकन अभिनेत्री आणि कार्यकर्ती ऑड्री हेपबर्नशी साम्य असलेला सोफिया हा रोबो आहे. 'मला या निर्णयाचा अत्यंत अभिमान वाटत आहे' असं सोफियाने एका मुलाखतीत सांगितलं. नागरिकत्व मिळालेला जगातला पहिला रोबो होण्याचा मान मिळणं ऐतिहासिक असल्याच्या भावनाही तिने व्यक्त केल्या.

मानवसदृश्य रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हँसन रोबोटिक्स या हाँग कॉंगच्या कंपनीसाठी डेव्हिड हँसन यांनी सोफिया रोबोची निर्मिती केली होती. माणसासारख्या क्षमता असलेली सोफिया ही रोबो चिडते, तशी दुःखी पण होते.



'मला माणसांसोबत राहायचं आहे आणि काम करायचं आहे. माणूस समजण्यासाठी आणि विश्वासाचं नातं निर्माण करण्यासाठी मला भावना व्यक्त करायची गरज पडते' असं सोफिया म्हणाली. मानवी आयुष्य सुकर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरावा लागतो, असंही ती म्हणते.

रोबोला नागरिकत्व दिल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. 'मानवी रोबोला सिटीझनशिप मिळते, तर लाखो नागरिक बेघर आहेत. काय वेळ आली आहे' अशी टीका ट्विटरवर केली जात आहे.