Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियातील मदिनाजवळ एक मोठा रस्ता अपघात (Saudi Arabia Bus Accident) झाला आहे. या अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रवासी उमरा करण्यासाठी सौदी अरेबियाला गेले होते आणि मक्काहून मदीनाला जात होते.
नेमकं काय घडलं? (Saudi Arabia Bus Accident)
मक्काहून मदीनाला जात असताना मुफरीहाटजवळ बस एका डिझेल टँकरशी धडकली, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगात बसमधील 43 पैकी 42 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 20 महिला आणि 11 चिमुकल्यांचा समावेश आहे. तर बसमधील एक प्रवासी बचावला. घटनेत वाचलेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मृत झालेले सर्व 42 प्रवासी हैदराबादमधील-
आज मध्यरात्री रात्री उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस मक्काहून मदिना येथे जात असताना एका डिझेल टँकरशी धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि आग लागली. मिळालेल्या माहितीनूसार मृत झालेले सर्व 42 प्रवासी भारतातील हैदराबाद येथील रहिवासी होते. दरम्यान, सौदी अरेबियातील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. टोल-फ्री क्रमांक 8002440003 आहे. भारतीय दूतावासाने 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला शोक- (Saudi Arabia Bus Accident)
दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी तेलंगणा सरकारचे अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा, असे निर्देशही रेवंत रेड्डी यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सर्व माहिती मिळावी, यासाठी एका कंट्रोल रुमची स्थापना करण्यात येणार आहे.