Saudi Arabia Accident: सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची भीती व्यक्त केली आहे. सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर (Madina News) रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्रवाशांच्या बसला आग लागून त्यामधील प्रवाशी मृत्युमुखी पडले. या बसमध्ये मदिना येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक होते. यापैकी 42 नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Saudi Arabia news)

Continues below advertisement

या अपघातासंदर्भात अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र, मदिना यात्रा आयोजित करणाऱ्या टूर ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डिझेल टँकरला धडकल्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला. त्यामुळे आतमध्ये असलेल्या 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. मक्का (Makka news) येथील दर्शन घेऊन हे सर्व भाविक मदिना येथे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. सौदी अरेबियातील स्थानिक प्रशासनाकडून अद्याप 42 भारतीय प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आलेला नाही. या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी तेलंगणा सरकारचे अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा, असे निर्देशही रेवंत रेड्डी यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सर्व माहिती मिळावी, यासाठी एका कंट्रोल रुमची स्थापना करण्यात येणार आहे.

सौदी अरेबियातील स्थानिक यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासणी आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेबाबत सौदी किंवा भारतीय सरकारकडून अद्याप मृतांच्या अधिकृत संख्येची घोषणा करण्यात आलेली नाही. आता जखमींवर योग्य ते उपचार करण्यासाठी आणि कुटुंबीयांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून काही पावले उचलली जातात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Continues below advertisement

आणखी वाचा

'15 मिनिटांत घरी पोहोचतोय, वाढदिवसासाठी पावभाजीचं सामान घेतलंय'; पण नवले ब्रीजजवळ भीषण अपघात अन् आनंदावर विरजण, भीषण अपघातात कारमधील कुटुंबातील चौघांचा मृत्यू