मुंबई: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड (Mastermind Of Mumbai Terrorist Attack) साजिद मीरवर (Sajid Mir) पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. साजिद मीर सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताकडे होणारे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी विषप्रयोगाचं नाटक रचल्याचा भारतीय यंत्रणांना संशय आहे. 


मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान साजिद मीर हा दहशतवाद्यांशी संपर्कात होता. तो अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानातून आदेश देत होता. साजिद मीर हा लष्कर-ए-तय्यबा चा फॉरेन रिक्रूटर होता तसेच अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचादेखील मुख्य हॅंडलर होता. 


साजिद मीरवर अमेरिकच्या एफबीआयने 5 कोटी डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. टेरर फायनान्सिंग प्रकरणी मीरला 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


पाकिस्तानमध्ये 15 वर्षांची शिक्षा 


पाकिस्तानमधील एका तुरुंगात अज्ञात व्यक्तीने साजिद मीरवर विष प्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. मात्र भारताच्या या मोस्ट वाँटेड दहशतवादाशी संबंधित या बातमीत किती तथ्य आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही. परदेशी भूमीवर भारताच्या शत्रूंचा एकापाठोपाठ खात्मा होत असताना ही बाब समोर आली आहे. अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न आणि कॅनडात दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा मृत्यू ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.


साजिद मीरला विषबाधा झाल्यानंतर सीएमएच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बहावलपूरमध्ये आणण्यात आल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. साजिद मीरला काही महिन्यांपूर्वीच लाहोर सेंट्रल जेलमधून दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती.


कोण आहे साजिद मीर? (Who Is Sajid Mir) 


26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर मीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. साजिद मीरने हाफिज सईदसह दहशतवादी हल्ल्याची पद्धती तयार केली होती. मुंबई हल्ल्यात 166 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 2011 मध्ये अमेरिकन कोर्टात त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याच्यावर पाच दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अमेरिकेने त्याला दहशतवाद्यांना भौतिक मदत पुरवणे, अमेरिकन नागरिकांची हत्या, सार्वजनिक वापराच्या ठिकाणी बॉम्बफेक करणे यासाठी दोषी ठरवले.


मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव


2023 च्या सुरुवातीला चीनने मीरला जागतिक दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला होता. या काळात भारताने चीनवर जोरदार टीका केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव प्रकाश गुप्ता म्हणाले, "जर आपण संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्याला अटक करू शकत नसलो, तर दहशतवादाविरुद्ध प्रामाणिकपणे लढण्याची खरी राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा हा पुरावा आहे." ते म्हणाले, कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सर्व सदस्य देशांची संमती आवश्यक असते. मात्र दहशतवादाविरोधातील प्रस्तावावर काही देशांनी आडकाठी आणल्याने त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मीरचा जागतिक दहशतवादाच्या यादीत समावेश झाल्यास त्याच्याशी संबंधित संपत्ती जप्त केली जाईल. तसेच त्याच्या प्रवासावर जगभरात बंदी घालण्यात येणार आहे. यासोबतच अनेक कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत.


ही बातमी वाचा: