नवी दिल्ली : ऐंशीच्या दशकात केजीबी हे नाव उच्चारलं तरी भीती वाटावी अशा कथा ऐकायला मिळायच्या केजीबीच्या गुप्तहेरांच्या. तत्कालीन सोव्हियत युनियनची गुप्तहेर संघटना म्हणजे केजीबी. त्यांचे गुप्तहेर जगभर पसरले होते. जगातल्या मोठमोठ्या व्यक्तींवर त्यांचं लक्ष असायचं. कितीतरी नामवंत व्यक्तींना यांनी यमसदनी धाडलं असं कायम बोललं जातं पण कशाचाच पुरावा केजीबीवाल्यांनी कधी ठेवला नाही. अशा केजीबीचा अत्यंत धाडसी गुप्तहेर ज्यानं जर्मनी पुन्हा एकत्र येईपर्यंत पूर्व जर्मनीत अत्यंत धोकादायक परिस्थितीत गुप्तहेर म्हणून काम केलं त्या गुप्तहेराचं नाव आहे व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin). हेच पुतीन आता रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी 2036 सालापर्यंत विराजमान असतील, याला जनतेनेच जनमत चाचणीतून मान्यता दिली आहे.
सोव्हियत युनियनचे तुकडे झाले आणि काही वर्षातच रशियात पुतीन पर्व सुरु झालं. सध्या व्लादिमीर पुतीन हे जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असणाऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सध्या ते जगभरातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. 2000 सालापासून ते रशियाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान राहिले आहेत. सलग 20 वर्ष सत्तेवर राहण्याचा विक्रम सध्या त्यांच्या नावावर आहे. पण आता हा विक्रम आणखी 16 वर्ष त्यांच्याच नावावर राहील असा बदल रशियाच्या संविधानात केला जाणार आहे.
पाहा व्हिडीओ : चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसावर अमेरिका निर्बंध घालणार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी एका व्यक्तीनं निवडणूक लढवण्याच्या बदलाला आज रशियन जनतेनं बहुमतानं मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासुन सत्तेत असलेले 67 वर्षीय पुतीन आता 2036 सालापर्यंत म्हणजेच, वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेले सात दिवस रशियात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मतदान सुरु होतं, यात संवैधानिक बदलांना जनतेकडून मान्यता मिळणं अपेक्षित होतं. या मतदानात 77 टक्के जनतेनं पुतीन यांना अपेक्षित बदलांच्या बाजुनं मतदान केलं आहे.
पुतीन यांची सध्याची कारकीर्द :
- रशियात राष्ट्राध्यक्षपदाची टर्म सहा वर्षाची असते.
- एक व्यक्ती सलग दोनदा निवडणूक लढवू शकते.
- पुतीन 2000 ते 2008 रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते.
- त्यानंतर 2008 ते 2012 ते रशियाचे पंतप्रधान होते.
- पुतीन 2012 साली पुन्हा निवडणूक लढून जिंकले.
- त्यानंतर 2018 साली पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले.
- पुतीन यांचा सध्याची टर्म 2024 साली साली संपणार आहे.
रशियाच्या सध्याच्या संविधानानुसार, त्यानंतर पुतीन दोन टर्म सलग झाल्यानं निवडणूक लढू शकणार नाही. मात्र आज झालेल्या जनमतानंतर संविधानात बदल करुन पुतीन 2036 पर्यंत सलग राष्ट्रपती राहू शकणार आहेत. खरं तर मरेपर्यंत आता रशियाचं राष्ट्राध्यक्षपद सोडायचं नाही यादृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचा त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. तो आरोप जरी असला तरी वयाच्या 83व्या वर्षापर्यंत ते सत्ता सोडणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
आता चीनकडूनही भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे
चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार?