Russia Ukraine War :  मागील 12 दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता या युद्धात चीनची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत चीनने थेटपणे भाष्य केले नव्हते. आता मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. 


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये तिसऱ्या फेरीची चर्चा सुरू होण्याआधीच चीनने मध्यस्थ होण्याची तयारी दर्शवली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युक्रेनच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी चीनकडून सर्व प्रयत्न केले जातील. रशिया-युक्रेन युद्धात आवश्यक मध्यस्थ म्हणून चीन भूमिका बजावण्यास तयार आहे. शांततेसाठी चीनकडून प्रयत्न होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. 


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीनचे रेडक्रॉस लवकरच युक्रेनला मदत पाठवणार आहे. चीन आणि रशियाची मैत्री घट्ट असल्याचेही त्यांनी म्हटले.  संयुक्त राष्ट्र संघात रशियाविरोधात आलेल्या प्रस्तावावर चीनने तटस्थ भूमिका घेतली होती. भारतानेदेखील तटस्थ भूमिका घेतली होती. 


रशियाकडून शस्त्रसंधीची घोषणा 


दरम्यान, रशियाकडून मागील 12 दिवस युक्रेनवर हल्ला केले जात आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ले, गोळीबारात सामान्यजणांचे हाल होत आहेत. आता रशियाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी चार शहरांमध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. यामध्ये राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी आणि मारियूपोल या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


रशियाने शनिवारीदेखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. रशियाच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी 10 वाजल्यापासून ही शस्त्रसंधी लागू होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आज तिसऱ्या फेरीतील चर्चा होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की फोनवरून चर्चा करण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: