Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. मागील 10 दिवसात कीव्हमधील भारतीय दूतावासाकडून तिसरी ॲडव्हायजरी जारी करून नागरिकांना हे आवाहन केले आहे. मोठ्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या ॲडव्हायजरीमध्ये भारतीय दूतावासाने कीव्हमधील दूतावासासोबत संपर्क न झाल्यास रोमानिया, स्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरीमधील दूतावासांना संपर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत.


तत्पूर्वी,  दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेनच्या सीमेतून बाहेर निघण्याचे पाच पर्याय सांगितले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कीवमधील दूतावासाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय नागरिकांना सीमा ओलांडण्यासाठी उपलब्ध पर्याय शेअर केले. ही माहिती युक्रेन-हंगेरी, युक्रेन-स्लोव्हाकिया सीमा, युक्रेन-मोल्दोव्हा, युक्रेन-पोलंड आणि युक्रेन-रोमानिया सीमा ओलांडून युक्रेन सोडण्याच्या संबंधात होती.


दूतावासाने म्हटले आहे की, सीमा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकांनी देश सोडताना सुरक्षेची मोठी खबरदारी घ्यावी. युक्रेन-हंगेरी सीमेसाठी दूतावासाने सांगितले की चेकपॉईंट्स Zakarpattia प्रदेशात आहेत (टायसा, झ्विन्कोव्ह, लुझांका, वायलोक, चॉप फक्त वाहनांसाठी). चोप शहरात रेल्वेने प्रवास करणे हा एक सोयीचा पर्याय आहे. भारतीय नागरिकांकडे वैध पासपोर्ट, वैध युक्रेनियन निवासी परवाना (Posvidka), विद्यार्थी कार्ड/विद्यार्थी प्रमाणपत्र (असल्यास) आणि शक्यतो सीमा ओलांडण्यासाठी हवाई तिकीट असणे आवश्यक आहे.


कीववर रशियन हल्ले


दरम्यान, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, युक्रेनच्या राजधानीवर रशियाने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन हल्ल्यामुळे युक्रेनची 30 टक्के वीज केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. पुतीन यांच्या राजवटीत चर्चेसाठी जागा उरली नाही. युक्रेनियन ऊर्जा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणारा हा रशियन दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. झेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ''10 ऑक्टोबरपासून युक्रेनमधील 30% वीज केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात ब्लॅकआउट झाला आहे. पुतीन यांच्या राजवटीत चर्चेसाठी जागा उरलेली नाही.''


इतर महत्वाची बातमी: 


किंग चार्ल्स यांनी ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून केली नियुक्ती, सरकार स्थापनेसाठी केले आमंत्रित