मॉस्को : रशियात महाभयंकर भूकंपानंतर रशियाच्या किनारपट्टीवर आणि जपानच्या अनेक भागात त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसला आहे. प्रशांत महासागरात झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळं अमेरिका देखील सतर्क झाली आहेत. रशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कामटका येथे भीषण भूंकप झाला. हा या दशकातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेनं हा सर्वात सहावा तीव्र भूकंप असल्याचं म्हटलं आहे.
जपानच्या कुजी बंदर, हामानाका शहरात मोठ्या लाटा नोंदवल्या गेल्याची माहिती आहे. लाटांची उंची 20 सेंटीमीटरपासून तब्बल 60 सेंटीमीटरपर्यंत नोंदवली गेली. जपानला पुढील 24 तास त्सुनामी लाटांचा तडाखा सहन करावा लागणार आहे. दरम्यान जपानच्या विविध भागातून तब्बल ९ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. जपानच्या हवामान विज्ञान एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार 30 सेंटीमीटर ऊंचीची पहिली लाट होक्काइडोच्या पूर्व किनारपट्टीवरील नेमुरोपर्यंत पोहोचली. प्रशांत त्सुनामी इशारा केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार हवाई, चिली, जपान आणि सोलोमन द्वीप समुहाच्या किनारपट्टीवर एक ते तीन मीटर ऊंचीच्या लाटा उसळू शकतात. रशिया आणि इक्वाडोरमध्ये किनारपट्टीच्या भागात तीन मीटरहून ऊंच लाटा उसळू शकतात.
रॉयटर्सच्या माहितीनुसार सुनामीच्या लाटांनी पहिल्यांदा कामचटका येथे नुकसान केलं. त्यामुळं सेवेरो-कुरिल्स शहरातील बंदरं आणि मत्स्य प्रक्रिया केंद्रात पाणी घुसलं आहे. रशियाच्या सरकारनं दिलेल्या माहितीनुसार किंडगार्टन भवनाचं नुकसान झालं आहे.
व्हेल मासे किनारपट्टीवर, लोक घरांच्या छतांवर
त्सुनामी संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. भीषण भूकंप झाल्यानंतर किमान 4 व्हेल मासे जपानच्या किनारपट्टीवर आले होते. त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर जपानमधील होक्काइडो येथील लोक छतांवर जाऊन बसले होते. त्सुनामीचा इशारा अमेरिका आणि फिलीपाईन्सच्या किनारपट्टीला देखील जारी करण्यात आलं आहे.
रशियातील काही भागात आणीबाणी जाहीर
रशियाच्या साखालिन सरकारच्या माहितीनुसार आज उत्तरी कुरिल डिस्ट्रीक्टमध्ये त्सुनामी आली आणि भूकंप झाली तिथं आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पूर्व रशियाचे गव्हर्नर यांनी लोकांनी किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार त्सुनामीच्या लाटा 4 मीटर ऊंचीच्या होत्या. काही भागात यामुळं मोठं नुकसान झालं आहे.
प्रशांत त्सुनामी इशारा केंद्रानं भूकंपामुळं त्सुनामी आली असल्याचं म्हटलं. ज्यामुळं सर्व हवाई बेटांच्या किनारपट्टीवर नुकसान झाल्याची शक्यता आहे. रशियाची वृत्तसंस्था 'तास' नं भूकंप केंद्राजवळील सर्वात मोठं शहर असलेल्या पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की येथून लोक भूकंप होताच तातडीनं घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याची माहिती दिली. घरांचं मोठं नुकसान झालं, इमारती जोरात हलत होत्या, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
अमेरिका येथील अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी इशारा केंद्रानं अलास्का अल्यूशियन द्वीप समुहाच्या काही भागांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. कॅलिफोर्निया, ओरेगन, वॉशिंग्टन, पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.