नवी दिल्ली : ब्रिटेन सरकारच्या मालकीची रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड (RBS) व्यवस्थापनाने जवळपास 400 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी असल्याचं बोलले जात आहे. कारण बँकेला कमी गुंतवणुकीतून बँकेची काम पूर्ण करुन घ्यायची असल्याने, यातील बहुतांश नोकऱ्या भारतात हस्तांतरित केल्या जाणार आहेत.


आरबीएस बँक व्यवस्थापनाने व्यवसायिक कर्ज विभागातील 443 जणांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडून हा निर्णय नित्य प्रक्रियेचाच भाग असल्याचं सांगितलं जात आहे. पण यातून भारतीय नोकरदारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

याबाबत बँकेच्या प्रवक्त्याने सांगितलं की, ''सध्या बँकेचं स्वरुप लहान झालं आहे. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीत आम्ही काही बदल करत आहोत. ज्या माध्यमातून आमच्या असंख्य ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या जाणे शक्य होईल. त्यासाठी दुर्दैवाने ब्रिटेनमधील आमच्या 443 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे. तेव्हा या निर्णयाने आमच्या बँक कर्मचाऱ्यांच्या कामावर नक्कीच नकारात्मक परिणाम होईल.''

बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी असल्याचंही बँकेच्या प्रवक्याने सांगितलं. प्रवक्त्यानं सांगितलं की, ''बँक व्यवस्थापनाला कमी गुंतवणुकीद्वारे बँकेच्या कामकाज पूर्ण करायचे आहे. त्यासाठी यातील बहुतांश नोकरीच्या संधी भारतासाठी हस्तांतरीत करण्यात येतील.''

सध्या आरबीएस बँकेत ब्रिटन सरकारची 73 टक्के गुंतवणूक आहे. त्यामुळे या बँकेला ब्रिटनची सरकारी बँक म्हणूनच ओळखलं जातं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयटी क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली होती. त्यावेळी आयटी क्षेत्रावर मंदीचं सावट असल्याचं बोललं जात होतं. पण यावर आयटी क्षेत्रातली संघटना नास्कॉम आणि सरकारने आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपात हा त्यांच्या कालानुक्रम असल्याचं सांगितलं होतं.