काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 03:28 PM (IST)
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय राजदूत मनप्रीत वोहरा यांच्या घरात रॉकेट कोसळलं. मनप्रीत वोहरा यांच्या घराच्या टेनिस कोर्टमध्ये रॉकेट कोसळलं. आज सकाळी 11.15 वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, कोणत्याही भारतीयाला दुखापत झालेली नाही. हा अपघात होता की घातपात?, जर घातपात असेल तर कोणी घडवला हे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काबूल शहर हायअलर्टवर असताना ही घटना घडली. याआधी 31 मे रोजी काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू झाला होता, तर 325 पेक्षा जास्त जखमी झाले होते. त्यावेळीही भारतीय दुतावासाचे सर्व कर्मचारी सुदैवाने सुरक्षित होते.