नवी दिल्ली: भारतातील एक संस्था गरिबांना मोफत जेवण वाटण्याचं काम करते. रॉबिन हूड आर्मी असं या संस्थेचं नाव असून यात काम करणारे स्वयंसेवक इतर ठिकाणी नोकरी करतात. ही संस्था कोणताही मोबदला न घेता गरीब मुलांना आणि गरजूंना जेवण पोहोचवण्याचं काम करते.
या संस्थेचं नाव रॉबिन हूडच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. रॉबिन हूड श्रीमंतांच्या घरी चोरी करून गरिबांना मदत करत होता. पण रॉबिन हूड आर्मी ही संस्था स्वत:हून मदत करणाऱ्या लोकांच्या साहाय्याने गरिबांची भूक भागवते.
रॉबिन हूड आर्मी कसं काम करते?
रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक वेगवेगळ्या शहरात नोकरी करणारे सामान्य नागरिक आहेत. आपल्या परिसरातील हॉटेल्सना संपर्क साधून, त्यांच्याकडे उरलेलं अन्न एकत्र जमवलं जातं. यानंतर हे जेवण शहरातील विविध भागात गरीब लोकांमध्ये वाटलं जातं. काही रेस्टॉरंटनी या संस्थेसाठी वेगळं जेवण बनवायलाही सुरूवात केली आहे.
स्वातंत्र्यदिनी या संस्थेने 5 लाख लोकांना जेवण देण्याचा संकल्प केला होता. भारतासह पाकिस्तानातील गरीब लोकांना जेवण देण्याचं काम ही संस्था करते.
2014 मध्ये दिल्लीतून सुरूवात
या संस्थेची स्थापना नील घोष आणि आनंद सिन्हा यांनी केली असून, दोघेही पोर्तुगालमध्ये राहतात. नील घोष यांचा पोर्तुगालमधला मित्र पाकिस्तानचा आहे. त्याच्या माध्यमातून ही संस्था पाकिस्तानातही गरिबांना जेवण वाटते.