टोरंटो : कॅनडातील ओंतारिओमधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी असल्याचं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. हा कांदा स्तनाच्या आणि आतड्याच्या कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यास प्रभावी असल्याचं संशोधन सांगतं. अन्य कोणत्याही प्रकारच्या कांद्याच्या तुलनेत ओंतारिओमधील लाल कांद्यात क्वेरसेटीन आणि अन्थोसायनिनचं प्रमाण जास्त असतं, ज्याच्यात कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता जास्त असते.


ओंतारिओच्या लाल कांद्यातील औषधी तत्व वेगळे काढण्यासाठी गुयेल्फ विद्यापीठातील संशोधक प्रा. सुरेश निधीराजन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. ओंतारिओतील पाच प्रकारच्या कांद्यांपैकी रुबी रिंग प्रकारचा लाल कांदा जास्त प्रभावी असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

ओंतारिओतील वातावरण रुबी रिंग जातीच्या कांद्यासाठी जास्त पोषक आहे, त्यामुळे अन्य ठिकाणच्या कांद्यापेक्षा या लाल कांद्यात क्वेरसेटीन आणि अन्थोसायनिनचं प्रमाण जास्त असतं, ज्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात. कांद्यातील हे दोन घटक कॅन्सरच्या पेशींसाठी मारक आहेत असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.