Research on SARS-CoV-2 : कोविड-19 (Covid-19) संसर्ग पसरवणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूबद्दल संशोधकांनी एक नवीन खुलासा केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमध्ये झालेल्या कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, हा विषाणू कोरोनाबाधित लोकांच्या हृदयाच्या स्नायूंना नुकसान पोहोचवतो.SARS-CoV-2 विषाणू हृदयाला कसे नुकसान पोहोचवतो यामागील कारण शास्त्रज्ञांनी शोधले आहे. एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविड-19 (Covid-19) ग्रस्त लोकांमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज येणे, हृदयाचे असामान्य ठोके, रक्ताच्या गुठळ्या होणे, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि संक्रमणानंतर किमान एक वर्ष हृदयाची गती कमी होण्याचा धोका जास्त असतो.


हृदयाशी संबंधित आजाराचा धोका 
शास्त्रज्ञांच्या मते, कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज होण्याचा धोका किमान 1 वर्ष टिकतो. तसेच ते म्हणतात की, बाधितांमध्ये हृदयविकाराचा धोका देखील निर्माण होतो. कोविड-19 रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी वैज्ञानिकांनी जलद लस तयार केली आहे. परंतु या लसी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या हृदयविकारापासून संरक्षण करण्यात अयशस्वी ठरतात.


HIV आणि Zika प्रमाणेच SARS-CoV-2 चा प्रभाव
कोरोना साथीचे तज्ज्ञ जे हान म्हणाले की, संसर्ग झालेल्यांवर दीर्घकाळ उपचार करायचा असेल तर आधी आपण या आजाराचे कारण समजून घेतले पाहिजे. ते म्हणाले की, संशोधनात असे दिसून आले की SARS-CoV-2 ची प्रथिने हृदयाच्या स्नायूंना प्रभावित करून नुकसान करतात. एचआयव्ही आणि झिका यांसारख्या इतर विषाणूंबाबतही असेच घडते. संशोधनादरम्यान, शास्त्रज्ञांच्या टीमला असे आढळून आले की 2 डीजी औषधामुळे हृदयाच्या स्नायूंना कमी नुकसान होत आहे. संशोधकांनी सांगितले की 2DG औषध स्वस्त आहे आणि प्रयोगशाळेत नियमितपणे वापरले जाते. ते म्हणाले की, यूएस प्रशासनाने उपचारांसाठी 2DG च्या वापरास परवानगी दिलेली नाही, परंतु कोविड-19 च्या उपचारासाठी या औषधाची चाचणी भारतात सुरू आहे.


माशी आणि उंदरांच्या हृदयाच्या पेशींवर अभ्यास
अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हृदयावरील SARS-CoV-2 विषाणूच्या प्रभावावर औषधाचा वापर केला. या संबंधित अभ्यासाचे वरिष्ठ लेखक जे हान म्हणाले: "आमचे संशोधन असे दर्शविते की SARS-CoV-2 प्रोटीन शरीरातील विशिष्ट स्नायूंचे मोठे नुकसान करू शकतात. या प्रकरणी नेचर कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये माशी आणि उंदरांच्या हृदयाच्या पेशींवरील अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जरी जगभरातील शास्त्रज्ञ COVID-19 रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी लस आणि औषधे झपाट्याने विकसित करत असले तरी, अभ्यासात असे म्हटले आहे की, हे उपचार एखाद्या सौम्य संक्रमणापासून होणाऱ्या हृदय किंवा इतर अवयवांच्या होणार्‍या नुकसानापासून संरक्षण करत नाहीत. हान आणि त्यांच्या टीमने माश्या आणि मानवी पेशी वापरून केलेल्या अभ्यासात SARS-Cov-2 सर्वात विषारी प्रोटीन ओळखले. अभ्यासानुसार, त्यांना आढळले की 'सेलिनेक्सर' या औषधाने यापैकी एका प्रोटीनचा विषारीपणा कमी केला, ताज्या अभ्यासात, त्यांना आढळले की, NSP6 हे सर्वात विषारी SARS-Cov-2 प्रोटीन फ्रूट फ्लाय हार्टमध्ये असल्याचे दिसून आले. या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की, NSP6 प्रोटीनने ग्लायकोलिसिस प्रक्रियेला चालना देण्यासाठी फ्रूट फ्लायच्या हृदयातील पेशींवर आक्रमण केले, ज्यामुळे पेशी ऊर्जेसाठी साखरेचे ग्लुकोज बर्न करू लागल्या. सामान्यतः, हृदयाच्या पेशी ऊर्जेचा स्त्रोत म्हणून फॅटी ऍसिडचा वापर करतात, परंतु हृदयाच्या मंदावलेल्या गतीमुळे साखर चयापचयमध्ये बदलते. कारण या पेशी खराब झालेल्या स्नायूंची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतात. संशोधकांना असेही आढळून आले की NSP6 प्रथिने मायटोकॉन्ड्रिया, पेशींमध्ये व्यत्यय आणून नुकसान करतात, जे साखर चयापचयातून ऊर्जा निर्माण करतात.


लवकरच दिसेल आशेचा किरण 
मेरीलँड विद्यापीठातील वैद्यकीय व्यवहाराचे उपाध्यक्ष मार्क ग्लॅडविन यांनी सांगितले की, अमेरिकेतील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही आठवडे आणि महिने हृदयविकाराने ग्रासले आहेत. ही गंभीर समस्या असून त्यावर उपाय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. संशोधकांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत कोविड-19 आजाराच्या हृदयावर होणाऱ्या परिणामाबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल. संशोधकांना आशा आहे की कोरोना विषाणूमुळे होणा-या आजारांवर उपचारही लवकरच सापडतील.