Raw Chicken Experiment : आजच्या काळात लोक स्वत:च्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक झाले आहेत, परंतु असेही काही लोक आहेत, जे जाणूनबुजून आपलं आरोग्य धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर एका तरुणाने तर फूड एक्सपेरिमेंटच्या (Food Experiment) नावाखाली कच्चं चिकन (Chicken) खाणं सुरू केलं आहे. मागील 17 दिवसांपासून तो हा प्रयोग करत आहे. त्याचं म्हणणं आहे की, जोपर्यंत त्याच्या पोटात दुखत नाही, तोपर्यंत तो असं करत राहणार.
हा व्यक्ती नेमका आहे कोण?
आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या या मुलाचं नाव जॉन आहे, त्याने इन्स्टाग्रामवर कच्चं चिकन खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या प्रयोगाला 'रॉ चिकन एक्सपेरिमेंट' (Raw Chicken Experiment) असं नाव दिलं आहे, 19 जानेवारीपासून तो हा प्रयोग करत आहे. अगदी ज्या प्रकारे कुत्रे-मांजरी कच्चं चिकन खातात, त्याच प्रकारे हा तरुण कच्च्या चिकनचे लचके तोडत आहे. दररोज न विसरता तो चिकन खातानाचा त्याचा व्हिडीओ पोस्ट करत असतो. कच्च्या चिकनसोबत तो 10-12 कच्ची अंडीही फस्त करतो.
जॉन आता फक्त 'त्या' दिवसाची वाट पाहतोय
जॉनच्या मते, कच्चं मांस खाणं हे शरीरासाठी तितकं हानिकारक नसतं, जितकं आपल्याला सांगितलं जातं. जॉनचा दावा आहे की, त्याने जेव्हापासून कच्चं चिकन खाणं सुरू केलं आहे, तेव्हापासून आजपर्यंत तो आजारी पडलेला नाही. जॉन म्हणतो, "जेव्हा कधी मला एखादा माणूस एखादी गोष्ट करु नको असं सांगतो, त्यावेळी माझी उत्सुकता आणखी वाढते आणि मी ती गोष्ट करुनच शांत बसतो. या वेळी चिकनसोबत असा प्रकार घडला. कच्चं चिकन खाऊ नको, असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं आणि तरी मी आता ते खात आहे."
जॉन म्हणतो, जेव्हा कच्चं चिकन खाण्याचे दुष्परिणाम त्याला दिसतील, त्याचं पोट दुखू लागेल, तेव्हाच तो कच्चं चिकन खाणं थांबवेल. त्याचा असाही विश्वास आहे की, जरी तो आजारी पडला तरी त्याचं फक्त हलकं पोट दुखेल आणि बाकी त्याला काही होणार नाही.
कमेंट्समधून लोक देत आहेत सल्ले
सोशल मीडियावरील अनेकजण जॉनला सावध करत आहेत. तू कच्चं चिकन खाऊ नकोस, यामुळे तुझं आरोग्य बिघडेल, असं ते सांगत आहेत. पण जॉनला कोणाचंच ऐकायचं नाहीये. आता जे काय आहे ते येणारी वेळच सांगेल, असं त्याचं म्हणणं आहे. याआधीही एका युट्युबरने असंच चॅलेंज स्वीकारलं होतं, शेवटी 200 दिवसांनंतर कच्चं चिकन खाऊन त्याला कंटाळा आला आणि त्याने हे चॅलेंज सोडून दिलं.
हेही वाचा: