न्यूयॉर्क: अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने यंदा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. कान्ये यानं शनिवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. ट्विट करत कान्येनं ही घोषणा केली. विशेष म्हणजे त्याला टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मास्क यांनी पाठिंबा दिला आहे. रॅपर कान्ये वेस्ट हा अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन हिचा पती आहे.

या वर्षाच्या शेवटी अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिडेन यांच्याच मुकाबला होणार असं मानलं जात होतं. मात्र आता मनोरंजन जगतातील स्टार रॅपर कान्ये वेस्ट याने ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत मुकाबला रोमांचक केला आहे. त्याने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'ईश्वरावर विश्वास ठेवून आपल्या अमेरिकेला दिलेली वचनं समजून घ्यायला हवीत. एका नव्या व्हीजनसह देशाच्या भविष्याबाबत विचार करायला हवा. मी अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार आहे' असं त्यानं म्हटलंय. या ट्विटमध्ये त्यानं 2020 व्हिजन हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

या घोषणेनंतर त्याला लोकांचं समर्थन देखील मिळत आहे. त्यात प्रामुख्याने टेस्लाचे प्रमुख एलन मास्क यांचा समावेश आहे. त्यांनी आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. रॅपर हा विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक मानला जातो. रॅपर कान्ये वेस्टला अनेकदा व्हाइट हाऊसमध्ये देखील जाण्याची संधी मिळाली आहे. आता त्यानं राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली याचा अर्थ ट्रम्प यांना आणखी एका विरोधकाचा सामना करावा लागणार आहे. रॅपर कान्ये वेस्टनं जरी निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी त्याला आणखी काही पाठिंबे मिळवावे लागणार आहेत. 50 राज्य आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बियामध्ये बॅलेटसाठी क्वालिफाय देखील करावं लागेल.

रॅपर कान्ये वेस्ट हा अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन हिचा पती आहे. किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये विवाह केला आहे. कान्येने 2015 मध्येच राष्ट्राध्यक्ष होण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. एक दिवस मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईन, असं त्यानं त्यावेळी म्हटलं होतं.