रघुराम राजन यांचा जगातील नावाजलेल्या अर्थतज्ज्ञांमध्ये समावेश होतो. बँक ऑफ इंग्डंच्या गव्हर्नरपदासाठी रघुराम राजन यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचं कळतं. इंग्लंडमधल्या फायनान्शिअल टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
विदेशी गव्हर्नरच्या शोधात बँक
- बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्ने जून 2019 मध्ये पदावरुन निवृत्त होणार आहेत. कॅनडात जन्मलेले मार्क कार्ने हे मागील तीन दशकात या बँकेच्या सर्वोच्च पदावर नियुक्त होणारे पहिलेच परदेशी नागरिक आहेत.
- मार्क कार्ने यांनी 2013 मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
- कार्ने यांच्या उत्तराधिकाऱ्यासाठी जगभरात शोध सुरु आहे, असं ब्रिटनचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी सांगितलं होतं. बँकेचा पुढील गव्हर्नर परदेशी असू शकतं, असंही ते म्हणाले.
खळबळ माजवणारी राजन यांची निवड
- ब्रिटीश वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सनुसार, जर बँक ऑफ इंग्लंडने रघुराम राजन यांना गव्हर्नर केलं तर तो खळबळ माजवणारा निर्णय असेलं. रघुराम राजन आपल्यासोबत उत्तम आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्स आणि केंद्रीय बँकिंग अनुभव घेऊन येतील, कारण त्यांनी भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम केलं होतं.
- परंतु राजन यांनी आतापर्यंत या पदासाठी कोणताही रस दाखवलेला नाही, असं वृत्तापत्रात म्हटलं आहे.
भारतीय वंशाच्या सृष्टी वडेरांचाही संभाव्य नावात समावेश
- वृत्तपत्रामधील सहा जणांच्या यादीनुसार, रघुराम राजन यांच्याशिवाय भारतीय वंशाच्या सृष्टी वडेरा यादेखील गव्हर्नरपदाच्या शर्यतीत सामील आहेत.
- सृष्टी सध्या ब्रिटीश बँक ग्रुप सॅनटेंडर, यूकेच्या प्रमुख आहेत. त्याआधी सरकारमध्ये व्यापार मंत्री होत्या.
नोटाबंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध
- रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला कडाडून विरोधही केला होता.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख राहिलेल्या राजन यांनी 2005 च्या मंदीचं भाकीत आधीच वर्तवलं होतं. मात्र त्यावेळी अनेक देशांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अमेरिकेसह अनेकांना बंदीचा मोठा फटका बसला होता.
कोण आहेत रघुराम राजन?
- रघुराम राजन यांचा जन्म मध्य प्रदेशची राजधानी भोपळमध्ये एका तामीळ ब्राह्मण कुटुंबात झाला होता. दिल्लीच्या आरकेपुरममधील डीपीएस स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं.
- यानंतर 1985 मध्ये आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. मग 1987 मध्ये अहमदाबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची डिग्री घेतली.
- रघुराम राजन यांनी 1991 मध्ये एमआयटी युनिव्हर्सिटीमधून 'एसेज ऑन बँकिंग'मध्ये पीएचडी केली.
- रघुराम राजन यांनी 4 सप्टेंबर 2013 रोजी यूपीए- 2 च्या कार्यकाळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2016 पर्यंत ते आरबीआयचे गव्हर्नर होते.
- रघुराम राजन सध्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये फायनान्सचे प्राध्यापक आहेत.
- बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.