Quiet Quitting : कधी काळी एखाद्याला एखाद्या ठिकाणी नोकरी (Job) लागली की ती टिकवण्यासाठी त्याचा संघर्ष असायचा. तेव्हा असं नसायचं की तिकडे चांगला पगार आहे म्हणून जुनी नोकरी सोडायची आणि नवीन सुरु करायची. कदाचित तशा ऑफर देखील त्या काळी नसायच्या. नोकरी एकदा लागली की ती टिकवण्यासाठी माणूस जीवाचं रान करायचा आणि पडेल ते काम त्या नोकरीमध्ये तो करायचा. 


पण आता परिस्थिती बदलली आहे. आज नोकरी लागली आणि वर्षभरात जर का एखाद्या व्यक्तीला जास्त पॅकेज भेटलं तर तो लगेच ही नोकरी सोडतो आणि दुसरी पकडतो. या सगळ्यात त्या व्यक्तीची त्या संस्थेशी किंवा त्याच्या बॉसशी बांधिलकी असते की नाही? हा भाग वेगळा. पण याने त्याच्या स्वतःचा वैयक्तिक फायदा तर नक्कीच होतो. कोरोना काळात तर बऱ्याच लोकांना 100 टक्के हाईक भेटली. (म्हणजे जर एखाद्याचा पगार 5 लाख वर्षाला असेल तर तो 10 लाख झाला )


याचा अर्थ जर तुम्ही आधीच्या कंपनीत जेवढं काम करत असाल. तेवढंच काम किंवा त्यापेक्षा जास्त काम तुम्हाला पगारवाढ भेटलेल्या कंपनीत करणं अपेक्षित आहे. पण जर तुम्हाला एवढं सगळं भेटून देखील तुम्ही कामात पाट्या टाकत असाल तर... असं झालंय. सध्या जगात बऱ्याच समाजमाध्यमांवर आणि मोठ्या कंपन्यांमध्ये quiet quitting ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. 


काय आहे हे quiet quitting?
quiet quitting याचा मराठीत थोडक्यात अर्थ जर आपण घ्यायचा ठरवला तर पाट्या टाकणे. एखाद्याने असंच चालू काम करुन दिल्यावर म्हणतो ना आपण काय अरे तू कामात पाट्या टाकतोय, ते पाट्या टाकणे म्हणजे quiet quitting.


यात अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये व्यक्तींना हे असं का करावं वाटते? काय आहेत याची नेमकी कारणं.


वर्क लाईफ बॅलन्स 
एखाद्या कर्मचाऱ्याची समजा 9 ते 5 या वेळेत नोकरी आहे, परंतु 5 नंतर त्याला थोडे काम येऊन पडले तर ते जास्त तास काम करणे टाळणे किंवा असलेल्या पुरतेच त्यांची कामे मर्यादित ठेवली आहेत. त्यांना काम पूर्ण करण्यासाठी कमीतकमी काम करायचे आहे आणि काम आणि जीवन यामधील संतुलन ठेवायचे आहे.


पलीकडे जाण्याचा विचार नाही (कंफर्ट झोन सोडायचा नाही)
आपण आपली नोकरी पूर्णपणे सोडत नाही आहात, परंतु आपण वर आणि पलीकडे जाण्याचा विचार सोडत आहात. म्हणजे तुम्ही ज्या पोस्टवर आहात त्या पोस्टवरच समाधानी आहात. वरच्या पोस्टला जायला तुमची धडपड नाही. काम हे तुमचं आयुष्य असलं पाहिजे, या धकाधकीच्या संस्कृतीच्या मानसिकतेचं तुम्ही आता सदस्यत्व घेत नाही. 


ऑफिस कल्चर (संस्कृती)
तुम्हाला काम आवडते आहे. तुम्हाला काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुम्हाला हे काम करावं वाटत नाही किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला जे बॉसकडून सहकार्य लाभत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काम करण्याची इच्छा होत नाही.


quiet quitting हे नेमकं आलं कुठून?
स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस 2022 च्या अहवालात असे दिसून आले आहे की केवळ 21 टक्के कर्मचारी हे सक्रियपणे त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. ही एक धक्कादायक आकडेवारी आहे. म्हणजे एखाद्या ऑफिसमधले केवळ 5 पैकी 1 व्यक्ती सक्रियपणे काम करतोय. त्यामुळेच जगभरात सध्या quiet quitting ची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या वर्षी देखील great resignation ची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.