कोलंबिया : आपल्या पतीचा राग आल्यावर पत्नी काय करु शकते याचं अनोखं उदाहरण समोर आलं आहे. जास्तीत जास्त पत्नी अबोला धरेल, भांडेल, किंवा माहेरी निघून जाईल. पण कोलंबियातील महिलेनं या सगळ्याची हद्द ओलांडत चक्क 70 नोटा गिळल्या आहेत, त्यापण फक्त नवऱ्याच्या रागातून.


कोलंबियातील एका महिलेनं नवऱ्याच्या रागातून 70 नोटा गिळल्या. सँड्रा अल्मेडा असं या महिलेचं नाव आहे. सँड्राचं नवऱ्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं. आपल्याला फसवल्याची भावना घेऊन सँड्रा जगत होती. पण त्याचवेळी आपला पती आपण साठवलेले सारे पैसे घेऊन पळ काढणार अशी कुणकुण तिला लागली आणि तिनं चक्क 7 हजार डॉलर्स म्हणजे साडे चार लाख रुपये गिळून टाकले. म्हणजे तिनं कोलंबियातल्या 70 नोटा गिळल्या आहेत.

70 नोटा गिळल्यानंतर तिची तब्येत बिघडली. पत्नी आजारी पडल्यामुळे पतीनं तिला रुग्णालयात दाखल केलं. पहिल्यांदा डॉक्टरांना वाटलं साधी पोटदुखी असेल. मात्र एक्सरेमधून जे समोर आलं ते पाहून सारेच अवाक झाले. तिच्या पोटाच चक्क 70 नोटा आढळल्या.

निदान झाल्यावर सँड्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या पोटातून 57 नोटा बाहेर काढण्यात आल्या, तर 13 नोटा तिच्या आतड्यांमध्ये आढळल्या आहेत. उरलेल्या नोटा नैसर्गिकरित्या बाहेर पडल्या तर ठीक, नाहीतर सँड्राला पुन्हा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.