वॉशिंग्टन डी सी : पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, "पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्यामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी घडतील. भारत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईच्या तयारीत आहे."


ट्रम्प म्हणाले की, "पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहेत. या हल्ल्यात भारताने 40 जवान गमावले आहेत. त्यामुळे भारतही मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. आम्ही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत."

ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानला 1.3 बिलियन डॉलर्स (9 हजार 234 कोटी रुपये)मदत करत होतो. परंतु पाकिस्तानकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने आम्ही ही मदत थांबवली आहे. यासंबंधी आम्ही पाकिस्तानसोबत बैठक घेणार आहेत.