लंडन : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग जगभरात गाजलं. लग्नात मिळालेला तब्बल 63 कोटी रुपये किमतीचा आहेर हे रॉयल नवदाम्पत्य परत करणार आहे.


कृपया भेटवस्तू आणू नयेत, असा स्पष्ट उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करुनही केनिंगटन पॅलेस गिफ्ट बॉक्सनी भरुन गेलं. सेलिब्रेटीज आणि काही कंपन्यांनी नवदाम्पत्याला गिफ्ट्स पाठवली होती.

ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स ही गिफ्ट्स परत करणार आहेत. सात मिलियन पाऊण्ड म्हणजे 62 कोटी 97 लाख 52 हजार 190 रुपये किमतीच्या या भेटवस्तू आहेत.

रॉयल कपलला आलेल्या बहुसंख्य भेटवस्तू प्रमोशनल असल्याची माहिती आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका कंपनीने रॉयल जोडप्याला हनिमूनला घालण्यासाठी बिकीनी आणि स्विमिंग ट्रंक कॉम्बोही पाठवला.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं 'रॉयल वेडिंग'

भेटवस्तू स्वीकारण्याबाबत रॉयल कुटुंबाची कठोर नियमावली आहे. केनिंग्टन पॅलेसच्या अधिकृत नियमांनुसार गिफ्ट घेताना संबंधित रॉयल सदस्याची परवानगी घेणं अनिवार्य आहे. रॉयल सदस्यांना वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या यूकेमधील ज्या नागरिकांनी भेटवस्तू पाठवल्या आहेत, त्यांचा हेतू माहित नसल्यामुळे, त्या परत केल्या जाव्यात.

दीडशे पाऊण्ड (13 हजार 493 रुपये) पेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तूच रॉयल कुटुंबाने स्वीकाराव्यात आणि वापराव्यात, असाही नियम असल्याचं म्हटलं जातं.

लग्नात भेटवस्तू पाठवण्याऐवजी धर्मादाय संस्थांना ही रक्कम दान करण्याचं आवाहन, ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स यांनी विवाहापूर्वी केलं होतं. जोडप्याने व्यक्तिशः निवडलेल्या या सात चॅरिटी ट्रस्ट्समध्ये मुंबईतील 'मैना महिला फाऊण्डेशन'चाही समावेश होता.

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये 19 मे रोजी झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.