PM Modi France Visit: फ्रान्ससोबतच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक भागीदारी आणि 75 वर्षांच्या मैत्रीला भारत मनापासून महत्त्व देत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. संरक्षण, अर्थव्यवस्था, गुंतवणूक इत्यादींमध्ये फ्रान्स हा प्राधान्यक्रमावरील भागीदार आहे. फ्रान्ससोबतची ही भागीदारी अधिक मजबूत करण्याची भारताची इच्छा आहे. ज्यामुळे तंत्रज्ञान, गुंतवणूक, पर्यटन इत्यादी क्षेत्रात भारताचे फ्रान्ससोबतचे संबंध अधिक दृढ होतील. भारत आणि फ्रान्समधील संबंध सातत्याने चांगले होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आता भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जुलैला पॅरिसमध्ये होणाऱ्या बॅस्टील डे परेडमध्ये विशेष अथिती म्हणून सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रोन यांनी निमंत्रित केले आहे. हे निमंत्रण पंतप्रधान मोदींनी स्विकारले आहे.
पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे हे आमंत्रण स्विकारल्यामुळे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक फोटो ट्विट करत म्हटले आहे की, 'प्रिय नरेंद्र, 14 जुलैला तुम्हाला परेडमध्ये विशेष अथिती पॅरिसमध्ये स्वागत करण्यात आनंद होत आहे'.
या दौऱ्यामधून काय अपेक्षा आहेत
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यातून भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक धोरणांसंबधी नवे करार करण्यात येतील. भारत आणि फ्रान्स मिळून इंडो-पॅसिफिक भागामध्ये शांतता आणि सुरक्षा ठेवण्याचं देखील काम करतील.
वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राअध्यक्ष मॅक्रॉन येत्या काळातील सर्वात मोठ्या आव्हानांवर चर्चा करतील. यामध्ये हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि शाश्वत विकासाचे लक्ष्य आदी मुद्यांवर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होईल.
भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी
फ्रान्ससोबतच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक भागीदारी आणि 75 वर्षांच्या मैत्रीला भारत मनापासून महत्त्व देत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. संरक्षण, अर्थव्यवस्था, गुंतवणूक इत्यादींमध्ये फ्रान्स हा प्राधान्यक्रमावरील भागीदार आहे. फ्रान्ससोबतची ही भागीदारी अधिक मजबूत करण्याची भारताची इच्छा आहे. ज्यामुळे तंत्रज्ञान, गुंतवणूक, पर्यटन इत्यादी क्षेत्रात भारताचे फ्रान्ससोबतचे संबंध अधिक दृढ होतील. 1998 मध्ये या धोरणात्मक भागीदारीच्या करारवर दोन्ही देशाकडून स्वाक्षरी करण्यात आली. केलेली धोरणात्मक भागीदारी सामायिक मूल्ये आणि शांतता, स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धोरणात्मक स्वायत्ततेच्या त्यांच्या आकांक्षांवर गती मिळवण्याचं या करारात नमूद करण्यात आलेलं आहे.