Queen Elizabeth II Funeral: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलला (Westminster Hall) भेट दिली आहे. येथेच राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीयांच्या वतीने राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी, शनिवारी राष्ट्रपती ब्रिटनच्या (Britain) राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात (Funeral)  सहभागी होण्यासाठी लंडनला पोहोचल्या.














राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला पोहोचल्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. लंडन विमानतळावरील त्यांच्या फोटोसोबतच्या ट्विटमध्ये त्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारताच्या वतीने शोक व्यक्त करणार आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


द्रौपदी मुर्मू यांनी शोकपत्रावर स्वाक्षरी केली


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये पोहोचून राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भारतीयांच्या वतीने आदरांजली वाहिली. यानंतर राष्ट्रपती मुर्मू या लंडनमधील लँकेस्टर हाऊसमध्ये पोहोचल्या. द्रौपदी मुर्मू यांनी लँकेस्टर हाऊस येथे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्याम, राणी एलिझाबेथ यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर आता 19 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार 


राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये अंत्यसंस्कार होणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.