वॉशिंग्टन : कोरोना संकटांचा सर्वाधिक कहर झेलत असलेल्या अमेरिकत सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर सुरु झालेल्या हिंसाचाराची झळ व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेर रविवारी (31 मे) आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, ट्रम्प यांच्या सुरक्षेला धोका नव्हता असं अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केलं. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीसह अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.


व्हाईट हाऊसमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी खास सुरक्षेसाठी बंकरची स्थापना केली आहे, जसं की एखादा दहशतवादी हल्ल्याची घटना. आता आंदोलनामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं बंकरमध्ये जाणं या मुद्द्याचा वापर विरोधक शस्त्र म्हणून करायला लागले आहेत.


अमेरिकेच्या मिनेपॉलिसमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा या कृष्णवर्णीय व्यक्तीला पकडलं होतं, तेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर मिनेपॉलिसमध्ये हिंसाचार उफाळला आणि तो अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये पसरला.


वाशिंग्टनमध्ये आंदोलक मोठ्या संख्येने व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळा होऊन घोषणाबाजी करु लागले. आंदोलकांनी पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पोलिसांवर फेकल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे गोळे फेकले. तर आंदोलकांनी व्हाईट हाऊसजवळ असलेल्या गाड्यांला आग लावली. पोलीस आणि विशेष सेवेच्या अधिकारी या गाड्यांचा वापर करतात. पोलिसांनी आतापर्यंत संपूर्ण अमेरिकेतून 1400 आंदोलकांना अटक केली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिनेपॉलिसमध्ये 26 मे रोजी पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका व्यक्तीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. एका श्वेतवर्णीय पोलिसाने रस्त्यावर आपल्या गुडघ्याने फ्लॉईडची मान सुमारे आठ मिनिटं दाबून ठेवली होती. यानंतर हळूहळू फ्लॉईडच्या हालचाली बंद होत गेल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये 40 वर्षीय पोलिसाकडे सातत्याने गुडघा बाजूला काढण्याची विनंती करत होता. यावेळी आजूबाजूला गर्दी जमा झाली. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.


यानतंर श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी (29 मे) अटक करण्यात आली. त्याच्यावर थर्ड डिग्री हत्या आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसक आंदोलन सुरु झालं आहे.