Pope Francis Meets PM Modi at the Vatican : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी व्हॅटिकन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट झाली. व्हॅटिकनमधील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोप फ्रान्सिस स्वागत केले. पोप फ्रान्सिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. आपण लवकरच भारताच्या दौऱ्यावर येऊ असं आश्वासन पोपनी पंतप्रधानांना दिलं आहे. जवळपास 22 वर्षानंतर पोप फ्रान्सिस भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान माननीय कार्डीनल पिएत्रो पारोलिन यांची देखील भेट घेतली. 


पोप फ्रान्सिस यांनी 30 ऑक्टोबर 2021 ला व्हॅटिकन शहरातील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. जवळपास 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानन आणि धर्मगुरु पोप यांची ही पहिलीच भेट ठरली. जून 2000 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हॅटिकनला भेट देऊन तत्कालीन पोप जॉन पॉल दुसरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप प्रान्सिस यांची भेट घेतली. भारत आणि व्हॅटिकन यांच्यातील मैत्रीची परंपरा जुनी असून या दोन देशांमध्ये 1948 सालापासून राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. भारतात राहणाऱ्या कॅथोलिक लोकांची संख्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त कॅथोलिक लोकसंख्या आहे.


या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे जगभरातील लोकांना सोसाव्या लागणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी हवामान बदलामुळे समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल देखील चर्चा केली. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच कोविड –19 प्रतिबंधक लसीच्या एक कोटी डोस देण्यात भारताने मिळविलेल्या सफलतेबाबत पंतप्रधानांनी पोप यांना थोडक्यात माहिती दिली. महामारीच्या काळात गरजू देशांना अनेक प्रकारे मदत केल्याबद्दल पोप यांनी भारताचे कौतुक केले.