British PM Rishi Sunak : ब्रिटनची सत्ता आता भारतीय वंशाच्या 'ऋषी' यांच्या हातात आहे, असं म्हणायला हरकत नाही. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण आहे, याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये लवकरच पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची भेट होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी 15-16 नोव्हेंबर रोजी बाली येथे असतील, जिथे त्यांची भेट होऊ शकते.

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असतीलअसे सांगण्यात येत आहे की, ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढील महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बाली येथे पहिली भेट घेणार आहेत. यावेळी मोदी आणि सुनक यांच्या द्विपक्षीय बैठकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या परिषदेदरम्यान दोन्ही नेते एकत्र असतील आणि अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होतील.

भारत-ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार करारालाही गती

सुनक आणि मोदी यांच्या संभाव्य भेटीमुळे भारत आणि ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार करारालाही गती मिळू शकते, या करारासाठी यापूर्वी दिवाळी-2022 चा कालावधी ठेवण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी लंडनलाही जाऊ शकतात. त्यादृष्टीने सुरुवातीचा टप्पाही सुरू झाला आहे.