बहारिन : जगासमोर भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे. भारत आज जगामध्ये चमत्कार करत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित आहेत. भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. मोदींनी आज बहारिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले.

ते म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करायचे भारताने ठरवले आहे. भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे.  अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्टक्चरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणाले की, भारतातील बहुतांश कुटुंब बँकिंग सेवेशी जोडलेली आहेत. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे. 50 कोटी भारतीयांना देशात मोफत उपचार मिळतात. आता भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे ते म्हणाले.

बहारिनमध्ये भारतीयांनी त्यांच्या मेहनतीने स्वत:ची जागा बनवली आहे. बहारिनचे सत्ताधारी तुमचे कौतुक करत असताना अभिमानाने माझा ऊर भरुन येत होता. बहारिनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे. इथे येऊन मला भारतात असल्यासारखे वाटत असल्याचे देखील ते म्हणाले.  बहारिनचे न्यू इंडियामध्ये स्वागत आहे.  दोन्ही देशांना परस्पराकडून भरपूर काही मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

मोदी यांनी भाषणाच्या शेवटी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांच्याबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. ते म्हणाले, एका बाजूला बहारिन उत्साहाने भरलेले आहे.  पण माझ्या मनात तीव्र दु:खाची भावना आहे. विद्यार्थी दशेपासून ज्या मित्रासोबत सार्वजनिक जीवनात पावले टाकली. राजकीय जीवनात एकत्र प्रवास केला. प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत होतो. स्वप्ने पाहिली, स्वप्ने पूर्ण केली. असा एक मोठा प्रवास ज्या मित्रासोबत केला. ते माझे मित्र अरुण जेटली यांचे आज निधन झाले, असे ते म्हणाले.