Pm Modi In Bali Indonesia : अमेरिकेची लोकसंख्या जेवढी आहे, तेवढी भारतात 2014 नंतर बँक खाती सुरू केली आहेत. शिवाय जवळपास 3 कोटी गरीबांसाठी मोफत घरं बांधून दिली. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक नागरिकाला घर मिळेल एवढी घरं बांधली आहेत. घर मिळाल्यानंतर व्यक्ती रातोरात लखपती होतो. गेल्या सात-आठ वर्षात 55 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. इंडोनेशिया येथे होणाऱ्या 17 व्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सध्या ते इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय जनसमुदायाला संबोधित केले. 


"2014 नंतर भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. कोरोना काळात देखील भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. याबरोबरच अनेक देशांना लसीचा पूरवठा देखील केला. डिजिटलायझेशनमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. याबरोबरच, आयटीसह अनेक रोगांवरील लसी तयार करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 2014 नंतरच्या आणि आधीच्या भारतात खूप मोठा फरक आहे. आज भारत प्रचंड वेगाने विकास करत आहे. भारत सरकार आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा रूग्णाचा खर्च उचलत आहे. आजचा भारत विकसीत भारत बनण्याचे स्वप्न पाहात आहे. परंतु, भारताचे हे लक्ष्य फक्त भारताचा एकट्याचा विकास नाही तर भारत या संपूर्ण विश्वाचा विकास करण्यासाठी आपला विकास करत आहे. आज भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. वातावरणीय बदलांच्या आव्हानांचा सामाना करण्यासाठी भारताने जगाला मिशन लाईफचा मंत्र दिलाय. पर्यावरणाला अनुकूल असलेले जीवनमान जगण्याचा भारताचा मंत्र आहे. भारताचा योग, आयुर्वेद संपूर्ण मानव जातीसाठी बक्षिस आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांबाबत नागरिकांना संबोधित करताना सांगितले. "भारत आणि इंडोनेशिया खांद्याला खांदा लावून विकास कामं करत आहेत. दोन्ही देशाचं नातं खूप खास आहे. अनेक भारतीय देखील इंडोनेशियाच्या विकासात योगदान देत आहेत. येथील विविध क्षेत्रात भारतीय नागरिक कार्यरत आहेत. सींधी, गुजराती, तामीळ यांच्यासह अनेक समुहाचे लोक येथे राहात आहेत. बालीमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार देखील बाली येथे केला जातोय याचा मला अभिमान आहे. भारत आणि इंडोनेशिया सुख आणि दु:खात एकत्र असतात. 2018 मध्ये इंडोनेशियामध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने ऑपरेशन समुद्रच्या माध्यमातून मदत केली. येथील अनेक गोष्टी भारत आणि इंडोनेशियाला एकसंघ ठेवतात. भारत आणि इंडोनेशीयामध्ये खूप साम्य आहे. इंडोनेशियाकडून शिकण्यासारखं खूप आहे. भारताकडून देखील इंडोनेशिया खूप काही घेऊ शकतो. आज जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये भारतीय लोक सीईयो पदावर कार्यरत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.