वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर आहेत. 26 जूनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये भेटून स्नेहभोजन करणार आहेत. एखाद्या देशाच्या पंतप्रधानासोबत व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजन करण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ असेल. स्नेहभोजनादरम्यान दोघांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही होणार आहे.


डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात 26 जूनला पहिल्यांदा भेट होईल. या भेटीत एक तास भारत आणि अमेरिका संबंधावर चर्चा होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं होतं. याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये आजपर्यंत तीनवेळा फोनवरुन विविध विषयांवर चर्चा झाली आहे.

अमेरिकेने स्वत: ला पॅरिस करारापासून वेगळं केल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट असल्याने, या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. कारण पॅरिस करारातून अमेरिकेने बाहेर पडण्याच्या निर्णयाची घोषणा करताना भारत आणि चीनवर निशाणा साधला होता. या करारातून अमेरिकेच्या एक्झिटचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीनला होणार असून, या करारातील अटींमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याचं ते यावेळी म्हणले होते.

याशिवाय H1-B व्हिसासंदर्भात अमेरिकेने कठोर भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवरही मोदी आणि ट्रम्प यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदींची आठवेळा भेट झाली आहे. यात पंतप्रधान मोदींनी तीनवेळा अमेरिकेचा दौरा केला, यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमध्ये ओबामांची भेट घेतली होती. तर 2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या निमंत्राणावर ओबामा भारतात आले होते.