नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील तहरिक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं.

मोदींनी इम्रान खान यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. शिवाय शेजारच्या राष्ट्राशी शांततेच्या मार्गाने विकास साध्य करायचा असल्याचं त्यांनी फोनवरुन सांगितलं आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची मुळं आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. आपण 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ, असं इम्रान खान यांनी जाहीर केलं असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढच्या 48 तासात होईल.

पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. असं असलं तरी पीटीआयकडे अजून बुहमताचा आकडा नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

पाकिस्तान संसदेच्या 342 जागांपैकी 272 जागा प्रत्यक्ष निवडून येतात. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 172 जागांची गरज असते. मात्र प्रत्यक्ष निवडून आलेल्या 272 जागांपैकी 137 जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. संसदेतील 60 जागा महिलांसाठी, तर 10 जागा अल्पसंख्यांकांसाठी राखीव ठेवल्या जातात.

दरम्यान, इम्रान खान यांच्या हातात पाकिस्तानचं नेतृत्त्व गेल्यानंतर सीमेवर शांतता स्थापित होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधून हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता मोदींनीही फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मोदी याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही इम्रान खान यांच्याशी त्यांची भेट झालेली आहे.