PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शनिवारी ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी होणार आहेत. या जी7 कॉन्फरन्समध्ये ते संबोधित देखील करणार आहेत. 12 आणि 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन भाषणं (PM Modi Speech Live) या समिटमध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे G7 समिटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होणार आहेत. याआधी 2019 साली फ्रांसमध्ये झालेल्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. 


लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक


ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रिताच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं आहे. जी-7 राष्ट्रांची यावर्षीची बैठक ही ब्रिटनमधील कॉर्नवल या ठिकाणी होत आहे. ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आपल्या निवेदनात भारताला 'जगाची फार्मसी' अशी उपमा दिली होती. तसेच कोरोना लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही करण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, "भारत जगातील 50 टक्क्यांहून जास्त लसींची निर्मीती करतोय. ब्रिटन आणि भारताने या कोरोनाच्या संकटाचा सामना एकत्रितपणे केला आहे."


G-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना ब्रिटनचे आमंत्रण, त्यापूर्वी बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा शक्य


यावेळी  G7 मध्ये कोरोना व्हायरस, फ्री ट्रेड आणि पर्यावरण या विषयांवर विस्ताराने चर्चा होणार आहे. कोरोना महामारीतून जगाला कसं सावरायचं हा विषय केंद्रस्थानी असणार आहे.  या बैठकीत वातावरण बदल आणि इतर महत्वाच्या विषयावर देखील चर्चा होणार आहे. जी-7 राष्ट्रांचा गट हा जगातील सर्वाधिक विकसित राष्ट्रांचा गट असून त्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे.


2020 मध्ये कोरोनामुळं G7 बैठक रद्द केली होती. भारताकडून पंतप्रधान मोदी यांच्या आधी मनमोहन सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील G7 मध्ये सहभाग घेतला होता. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये या परिषदेत सहभाग घेतला होता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे 2005 ते 2009 असे सलग पाच वर्ष या परिषदेत सहभागी झाले होते.