PM Modi Kuwait Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी ( 22 डिसेंबर 2024) कुवेत भेटीच्या शेवटच्या दिवशी बायन पॅलेस येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कुवेतने पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देऊन गौरव केला. बायन पॅलेस हे कुवेतमधील अनेक देशांचे दूतावासही येथे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा सन्मान देशाच्या प्रमुखांमधील मैत्रीचे प्रतीक आहे. परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना या सन्मानाने पुरस्कृत केले जाते. यापूर्वी ते बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आले आहे. तब्बल 43 वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने कुवेतला भेट दिली आहे. यावेळी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये अनेक करारांची शक्यता
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही होणार आहेत. भारत सरकार आखाती देशांशी संबंध दृढ करण्याच्या दिशेने काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्याशी चर्चा केली, ज्यात भारत-कुवेत संबंधांना विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला केले संबोधित
कुवेतच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (21 डिसेंबर 2024) येथे पोहोचले. गेल्या 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे.