नवी दिल्ली: अमेरिकेतील प्रसिद्ध 'टाईम' मॅग्झिनद्वारे घोषित करण्यात येणाऱ्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून अव्वल स्थान गाठले आहे. या यादीत मोदींनी ओबामा आणि ट्रम्प यांच्याशिवाय रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनपिंग यांनाही पछाडीवर टाकले आहे.
जगभरात स्वत:चा दबदबा निर्माण केलेल्या प्रसिद्ध व्यक्तीचा गौरव 'टाईम्स'च्यावतीने दरवर्षी केला जातो. गेल्यावर्षी या यादीत जर्मनीचे चान्सलर एंजेला मर्केल यांनी बाजी मारली होती. पण चालू वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अव्वल स्थान गाठले आहे.
विशेष म्हणजे, सलग चार वर्षे या यादीत स्थान मिळवण्याचा विक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांना 21 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच या यादीत विकीलीक्सचे वादग्रस्त व्यक्तमत्त्व ठरलेल्या ज्युलियान असांजे यांचाही समावेश असून त्यांना 8 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.
या यादीत सध्या तिसऱ्या स्थानी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असून त्यांना 7 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. तर त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम नागरिक मिशेल ओबामा यांना 5 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.
या यादीत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे बराक ओबामांच्या मागे आहेत. त्यांना प्रत्येक 5 टक्के नागरिकांना पसंती दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीतील डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांना चार टक्के नगरिकांनी पसंती दिली आहे. या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनफिंग सर्वात कमी लोकप्रिय व्यक्ती ठरले आहेत. त्यांना केवळ एक टक्काच नागरिकांनी पसंती दिली आहे.
या यादीसाठी एकूण 30 व्यक्तींची नावे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये व्हिसलब्लोअर ते खेळाडू आणि पॉप सिंगरपर्यंत सर्वांचाच समावेश होता. राजकीय क्षेत्र सोडून सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांना दोन टक्के, तर अॅप्पलचे सीईओ टिम कूक, प्रसिद्ध गायक बियॉन्से नॉलेस तसेच ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा यांना प्रत्येक एक टक्के जनतेने पाठिंबा दिला आहे.
या यादीच्या निश्चितीवर 'टाईम्स'च्या संपादक मंडळाचा अंतिम निर्णय असला, तरी 'टाईम पर्सन ऑफ द ईअर'च्या ठरवण्यासाठी वाचकांकडूनही ऑनलाईन मते मागवली जातात. यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाजी मारत, सर्वाधिक मते मिळवली आहेत.