“प्रत्येक भारतीय जगभरात राष्ट्रदूत आहे. आमचे प्रत्येक देशात राजदूत आहेत, मात्र तुम्ही आमचे राष्ट्रदूत आहात.”, असे पंतप्रधान मोदी नेदरलँडमधील अनिवासी भारतीयांना उद्देशून म्हणाले. शिवाय, भारतातून आलेल्या प्रवाशांमुऴे संस्कृती टिकून आहे, असेही ते म्हणाले.
भारतात जनतेच्या भागीदारीतून आम्ही प्रशासन चालवतो. त्यामुळे देशाचा विकास होतो. भारतातील सव्वाशे कोटी जनता देश चालवते, असे मोदी म्हणाले. शिवाय, फेडरल स्ट्रक्चरला आमच्या सरकारनं प्राधान्य दिलं आहे. विकास आणि चांगलं प्रशासन यानं राष्ट्र पुढे जातं, आमचाही तोच प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रनिर्माणामध्ये महिलांचं योगदान महत्त्वाचं आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 70 टक्के महिला आहेत, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.
नेदरलँडच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे चौथे पंतप्रधान आहेत. 1957 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे पहिल्यांदा नेदरलँडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर 1985 साली राजीव गांधी, त्यानंतर 2004 साली डॉ. मनमोहन सिंग नेदरलँड दौऱ्यावर गेले होते.