फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रविवारी विचित्र अपघात झाला. हवेत झेपावलेल्या एका प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, हॉलिवूड सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या प्लेन क्रॅशच्या घटनांप्रमाणे हे प्लेन थेट मुख्य महामार्गावरच क्रॅश झालं. अपघाताची ही दृश्ये महामार्गावर तैनात असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या डॅशकॅममध्ये कैद केली आहेत.

रविवारी फ्लोरिडाच्या क्लियर वाटर एअरपार्कच्या एअरबेसवरुन एका प्रवाशासह हे विमान हवेत झेपावलं. काही काळानंतर जिफ्रिहिल म्यूनिसपल एअरपोर्टवर हे विमान इंधन भरण्यासाठी उतरलं.

इंधन भरल्यानंतर हे प्लेन पुन्हा क्लियर वाटर एअरपार्कवर घेऊन जाण्यासाठी हवेत झेपावलं. पण यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, क्लियर वाटर एअरपार्कपासून केवळ दोनच किलोमीटर अंतरावर हे प्लेन क्रॅश झालं.

घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ पाहा

वास्तविक, प्लेनवरील नियंत्रण सुटल्याने ते झाडावर आदळलं, आणि त्यामुळे क्रॅश झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तसेच, प्लेन क्रॅश होताना किचनमधील एकाचवेळी अनेक प्लेट तुटल्यासारखं वाटल्याचं, ही घटना पाहणाऱ्या आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

प्लेन क्रॅश होताना महामार्गावर तैनात असलेल्या पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. यानंतर त्यांनी फेसबुकवर याचा व्हिडीओ पोस्ट केला. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचं पोस्टमधून सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, या अपघाताचा तपास एव्हिएशन अडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रांसपोर्टकडून सुरु आहे.