मनिला : फिलीपाईन्समधील एका तुरुंगावर बंदुकधाऱ्यांनी बुधवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यानंतर तब्बल 150 कैद्यांनी तुरुंगातून पळ काढला. त्यातील 6 कैद्यांचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला, तर 8 कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.


या हल्ल्यादरम्यान तरुंगाच्या एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्तीही जखमी झाला आहे.

तुरुंग अधिकारी पीटर बोंगट यांच्या माहितीनुसार, "शस्त्रधाऱ्यांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजता उत्तरेकडील कोटाबाटो शहरातील तुरुंगावर हल्ला केला. या जेलमध्ये 1511 कैदी आहेत, ज्यामधील काही कैद्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत."

हल्ला केलेला उग्रवाद्यांचा समूह बांग्समोरो इस्लामिक फ्रीडम फायटरशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. फिलीपाईन्सच्या मिन्दनाओ बेटावरुन हा समूह त्यांच्या कारवाई करतो.

हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. तसंच त्यांच्याकडे शस्त्रही होते. काही कैद्यांची सुटका करण्याच्या इराद्याने या समूहाने हल्ला केला होता. दरम्यान, पळून गेलेल्या कैद्यांना पुन्हा पकडण्यासाठी मोहीम सुरु केल्याचं पीटर बोंगट यांनी सांगितलं.